Virat Kohli-Gautam Gambhir Controversy: १ मे रोजी, आयपीएल२०२३ च्या ४३व्या सामन्यात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूरचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि लखनऊ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीर एकमेकांशी भिडले. दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. त्याचवेळी या सामन्यादरम्यान विराट कोहलीचा नवीन-उल-हकसोबत वादही झाला होता. हा वाद अजून संपलेला नाही. सामना संपवून पाच दिवस झाले तर याचे पडसाद मात्र पडतच आहेत. या लढतीनंतर विराट कोहलीने मोठे पाऊल उचलले.
पाच दिवसानंतर विराटने उचलले मोठे पाऊल
क्रिकबझच्या वृत्तानुसार, या वादाच्या पाच दिवसांनंतर विराट कोहलीने बीसीसीआयला पत्र लिहून आपली चूक नसल्याचे म्हटले आहे. माहितीसाठी की, त्या वादानंतर बीसीसीआयने कोहली आणि गंभीर यांना त्यांच्या मॅच फीच्या १०० टक्के आणि नवीनवर ५० टक्के दंड ठोठावला होता. अशा परिस्थितीत कोहलीला १ कोटी ७ लाख रुपयांचे नुकसान झाले होते, त्यानंतर कोहलीने या संदर्भात बीसीसीआयला पत्र लिहून म्हटले आहे की, त्या दिवशी नवीन-उल-हक आणि गौतम गंभीर यांच्यासोबत झालेल्या वादाच्या वेळी त्याने जे काही घडले ते सर्व मेल करून सांगितले. मी त्या दोघांचे काहीही चुकीचे बोललेलो नाही. यासोबतच किंग कोहलीने आपल्या पत्रात नवीन-उल-हकची तक्रार केली आहे.”
गंभीर आणि कोहली भिडले मैदानात
या सामन्यात बेंगळुरू संघाने लखनऊला विजयासाठी १२७ धावांचे लक्ष्य दिले होते, परंतु प्रत्युत्तरात के.एल. राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ संघ केवळ १०८ धावांवरच गारद झाला. त्यामुळे हा सामना आरसीबीने जिंकला. सामना संपल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू मैदानात हस्तांदोलन करत होते. त्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात एका गोष्टीवरून जोरदार शाब्दिक वादावादी झाली. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी गंभीर आणि कोहलीला एकमेकांच्या जवळ जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही. भडकलेला गौतम गंभीरने आरसीबीचा खेळाडू विराट कोहलीशी संपर्क साधला आणि दोघांमध्ये जोरदार वाद झाला. दोन्ही खेळाडूंना आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२१ अंतर्गत दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र, आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा खेळाडू विराट कोहलीने बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.
२०१३ मध्येही शाब्दिक वाद झाला होता
याआधी २०१३ मध्येही आरसीबी आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यादरम्यान विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात वादावादी झाली होती. गंभीर केकेआरचा कर्णधार असताना कोहली त्यावेळी सुपरस्टार होण्याच्या मार्गावर होता. गंभीर आजही तितकाच आक्रमक आहे आणि तो टीव्ही एक्स्पर्टही आहे. याशिवाय लखनऊचा मार्गदर्शकही आहेत. कोहली हा आरसीबीचा प्रमुख असला तरी कागदावर फाफ डू प्लेसिस हा कर्णधार आहे.