राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) फिरकीपटू युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) एका व्हिडीओत २०१३ मध्ये आयपीएल (IPL) दरम्यान घडलेली एक धक्कादायक घटना सांगितली. यानुसार मुंबई इंडियन्समध्ये असताना संघातील एका सहकारी खेळाडूने दारूच्या नशेत चहलला १५ व्या मजल्याच्या बाल्कनीत लटकवत ठेवलं होतं. यानंतर आता भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) या घटनेवर मोठं विधान करत एक मागणी केलीय.
विरेंद्र सेहवागने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, “ज्या खेळाडूने नशेत चहलसोबत तो प्रकार केला त्या खेळाडूचं नाव सांगणं गरजेचं आहे. जर हे खरं असेल, तर याला चेष्टामस्करी म्हणता येणार नाही. त्या दिवशी काय झालं होतं ते समजून घेणं गरजेचं आहे. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता काय कारवाई करण्यात आली होती?”
दरम्यान, सेहवागने केलेलं हे ट्वीट त्याच्या हँडलवरून डिलीट करण्यात आलं आहे.
यजुवेंद्र चहलने सांगितल्याप्रमाणे नेमकं काय घडलं होतं?
यजुवेंद्र चहल म्हणाला होता, “माझ्या सोबत घडलेल्या या घटनेविषयी खूप कमी लोकांना माहिती आहे. मी याबाबत कधीही कोणाला सांगितलं नाही. ही गोष्ट मी मुंबई इंडियन्स संघात होतो तेव्हाची म्हणजे २०१३ ची आहे. आमचा बंगलोरमध्ये एक सामना होता. त्यानंतर गेट टुगेदर होतं. तेव्हा एक खेळाडू खूप नशेत होता. मी त्यांचं नाव सांगणार नाही. तो बराच वेळेपासून मला पाहत होते. त्याने मला बोलावलं आणि बाल्कनीत लटकवलं.”
हेही वाचा : “लोक तुला मारून टाकतील, मुंबईत येऊन सचिनला बाद करायला तुला…”, शोएब अख्तरने सांगितला आयपीएलचा ‘तो’ किस्सा
“मी माझ्या हाताने त्या खेळाडूच्या माने मागे हात टाकून डोकं पकडलं. माझा हात सुटला असता तर… तेव्हा मी १५ व्या मजल्यावर होतो. अचानक तेथे अनेक लोक आले आणि त्यांनी परिस्थिती सांभाळली. मी बेशुद्धावस्थेत गेल्याप्रमाणे होतो. त्यांनी मला पाणी पाजलं. मला तेव्हा लक्षात आलं की आपण कोठेही गेलो तर आपण किती जबाबदारीने वागलं पाहिजे. ही अशी घटना होती ज्यात मी अगदी थोडक्यात बचावलो होतो. थोडी चूक झाली असती तरी मी १५ व्या मजल्यावरून खाली पडलो असतो,” असंही यजुवेंद्र चहलने नमूद केलं.