आयपीएल २०२२ च्या या हंगामातील १४ व्या सामन्यात कोलकाता (KKR) आणि मुंबईमध्ये (MI) बुधवारी (६ एप्रिल) चांगलाच चुरशीचा सामना झाला. १५ व्या षटकापर्यंत मुंबईच्या हातात असलेला हा सामना पॅट कमिन्सने अगदी शेवटी खेचून केकेआरच्या खिशात टाकला. कमिन्सने १५ चेंडूत ५६ धावांची स्फोटक खेळी केली. यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस आला. यात माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागचाही समावेश आहे. मात्र, सेहवागने ट्विटरवर दिलेली ही प्रतिक्रिया रोहितच्या चाहत्यांना अजिबातच आवडली नाही. यावर अखेर सेहवागने स्पष्टीकरण दिलंय.
कमिन्सने जोरदार फटकेबाजी करत मुंबईच्या हातातील सामना केकेआरच्या खिशात टाकला. यावर सेहवागने प्रतिक्रिया व्यक्त करत ट्वीटमध्ये म्हटलं, “तोंडातून घास काढून घेतला. सॉरी वडापाव ओढून घेतला. पॅट कमिन्सची ही खेळी ‘क्लिन हिटिंग’च्या सर्वोत्तम खेळीपैकी एक आहे. १५ चेंडूत ५६ धावा.”
सेहवागने आपल्या ट्वीटमध्ये तोंडातून वडापाव ओढून घेतल्याचं म्हणताच मुंबई इंडियन्स आणि रोहितचे चाहते चांगलेच आक्रमक होताना दिसले. त्यांनी सेहवागच्या ट्वीटवर प्रतिक्रियांचा पाऊस पाडत वडापाव उल्लेख रोहितसाठी केल्याचा आरोप करत टीका केली. अखेर यावर सेहवागला ट्वीट करत स्पष्टीकरण देण्याची वेळ आली. त्यात सेहवागने आपण वडापाव सेहवागला म्हटलं नसल्याचं सांगितलं.
हेही वाचा : VIDEO: “आवाज बढाओ यार…”, पॅट कमिन्सच्या स्फोटक फलंदाजीनंतर वैतागलेल्या रोहितची प्रतिक्रिया
सेहवागने आपल्या वडापाव वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना म्हटलं, “वडापावचा संदर्भ मुंबईसाठी आहे. एक शहर जे वडापाववर जगतं. रोहितच्या चाहत्यांनी सबुरीनं घ्यावं. तुमच्यापेक्षा मी रोहितच्या फलंदाजीचा मोठा प्रशंसक आहे.”