Virender Sehwag on Ruturaj Gaikwad: इंडियन प्रीमियर लीग २०२३ च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला गुजरात टायटन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. परंतु या सामन्यातील संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या कामगिरीने संघ व्यवस्थापनाला नक्कीच आनंद झाला असेल. खरं तर, गायकवाडने सामन्यात ९२ धावांची खेळी केली. यामुळे तो आयपीएल २०२३ च्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. वीरेंद्र सेहवागही त्याच्या कामगिरीचा चाहता झाला. त्याचबरोबर सेहवागने ऋतुराजच्या कामगिरीवर प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या तीन-चार वर्षांत ऋतुराज गायकवाड इंडियन प्रीमियर लीग चेन्नई सुपर किंग्स संघाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. आयपीएल आणि त्यानंतर देशांतर्गत मोसमातील दमदार फलंदाजीच्या जोरावर त्याला टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळाली, पण त्याला सातत्याने अनेक संधी देण्यात आल्या नाहीत. टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागलाही गायकवाडला भारतीय संघात खेळण्याच्या अनेक संधी का मिळाल्या नाहीत याचे आश्चर्य वाटते.
ऋतुराज पन्नास धावांचे शतकात रूपांतर करतो –
गायकवाडने सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला याचा सेहवागला आनंद आहे. क्रिकबझवर बोलताना सेहवाग म्हणाला, “गोष्ट फक्त अर्धशतक झळकावण्याची नाही, तर तो त्या पन्नास धावांचे शतकात रूपांतर करतो. यामुळे ऋतुराज आणखी खास खेळाडू ठरतो. दोन मोसमांपूर्वी त्याने सीएसकेसाठी धावा केल्या, तेव्हा त्याने शतकही ठोकले होते. पण तेव्हापासून त्याला टीम इंडियात खेळण्याची फारशी संधी मिळाली नाही याचे मला आश्चर्य वाटते.”
हेही वाचा – IPL 2023: रोहित शर्माने नोंदवला सर्वात लाजिरवाणा विक्रम; कर्णधार म्हणून केला ‘हा’ नकोसा पराक्रम
सीएसकेच्या कर्णधारपदासाठी ऋतुराज धोनीचा योग्य उत्तराधिकारी –
सेहवाग पुढे म्हणाला, “मला आश्चर्य वाटले की त्याला भारताकडून खेळण्याची अधिक संधी मिळाली नाही. कारण जेव्हा इतरांना संधी मिळते आणि ते चांगली कामगिरी करतात. त्यामुळे ऋतुराजला प्रतीक्षा करावी लागेल.जर हा मोसम चांगला गेला, तर त्याला टीम इंडियात खेळण्याची संधी मिळण्यासाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही. सीएसकेच्या कर्णधारपदासाठी ऋतुराज हा धोनीचा योग्य उत्तराधिकारी आहे, असे मला वाटते.”
आयपीएल २०२३चे पहिले पाच सामने खेळले गेले आहेत. म्हणजे १० संघांनी किमान त्यांचा एक सामना तरी खेळला आहे. अशात ऋतुराज ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. गायकवाडने आयपीएल २०२३ च्या सुरुवातीच्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध १८४ च्या स्ट्राईक रेटने ९२ धावांची खेळी केली. त्याने ४ चौकार आणि ९ षटकार मारले होते.