Virender Sehwag Statement On Shubman Gill : गुजरात टायटन्सचा संघ यंदाच्या आयपीएल २०२३ च्या हंगामात जबरदस्त प्रदर्शन करताना दिसत आहे. सामन्यांमध्ये सलग विजय संपादन करून गुजरात टायटन्स १४ अंकांच्या मदतीनं गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. गुजरातचा दहापैकी फक्त तीन सामन्यात पराभव झाला आहे. लखनऊ विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून प्ले ऑफ मध्ये प्रवेश करण्याचा गुजरातचा मानस आहे. या सामन्यात शुबमन गिलने धावांचा पाऊस पाडत ५१ चेंडूत ७ षटकार आणि २ चौकाराच्या मदतीनं ९४ धावांची नाबाद खेळी केली. तत्पूर्वी गुजरात टायटन्सचा सलामीचा धडाकेबाज फलंदाज शुबमन गिलच्या कामगिरीबाबत माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
गिलबाबात बोलताना सेहवाग म्हणाला, जर मी शुबमन गिल असतो तर स्वत:वर खूश नसतो. मी आणखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला असता. १० सामन्यांत ३७५ धावा केल्या आहेत. परंतु, यामध्ये खूप काही सुधारणा दिसत नाहीय. धावांचा आकडा बदू शकतो. शुबमन गिल जबरदस्त शॉट्स खेळतो. तो नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून मैदानात उतरतो. परंतु, धावांचे आकडे खूप मोठं समाधान देऊन गेले नाहीत. शेवटच्या चार सामन्यात तो कमालीची फलंदाजी करेल, अशी आशा आहे. त्याने शतक करावं अशी माझी इच्छा आहे.”
सेहवाग क्रिकबझशी बोलताना पुढे म्हणाला, दहा सामन्यांमध्ये शुबमनच्या जवळपास ५५० धावा व्हायला पाहिजे होत्या. तो भारतीय क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटसाठी खेळतो. त्याने धावांचा पाऊस पाडला आहे, त्यामुळे इनिंग खेळताना त्याने फॉर्मचा योग्य पद्धतीने उपयोग केला पाहिजे. जेव्ही तो पूर्ण सीजन खेळेल, तेव्हा त्याच्या ६००-७०० धावा पूर्ण होण्याची शक्यता आहे.”