IPL 2025 Virendra Sehwag Slams Rohit Sharma: रोहित शर्मा आयपीएल २०२५ मध्ये अपयशी ठरलेला दिसत आहे. पण रोहित प्रत्येक खेळीप्रमाणे धावसंख्येची गती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. रोहित शर्माने वानखेडेवर झालेल्या हैदराबादविरूद्ध सामन्यात २६ धावांची शानदार खेळी करत मोठमोठे फटके लगावले. पण पुन्हा एकदा तो मोठी धावसंख्या करू शकला नाही. दरम्यान वीरेंद्र सेहवागने त्याच्याबाबतीत मोठं वक्तव्य केलं आहे.

रोहित शर्माने यंदाच्या आयपीएलमध्ये गेल्या आतापर्यंत सहा डावांमध्ये फक्त ८२ धावा केल्या आहेत. तर आयपीएल २०२३ पासून आयपीएलमध्ये त्याची सरासरी २४.३९ राहिली आहे. दरम्यान मुंबई इंडियन्सकडून खेळताना यंदाच्या मोसमात रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळत आहे.

हैदराबादविरूद्धच्या सामन्यापूर्वी नाणेफेकीनंतर वीरेंद्र सेहवाग रोहित शर्मावर वैतागला. रोहित एक प्रतिभावान खेळाडू असून तो प्रत्येक सीझनमध्ये ४०० अधिक धावा करू शकतो. पण रोहित हल्ली टी-२० आणि वनडेमध्ये सलामीला उतरल्यानंतर नव्या चेंडूवर फटकेबाजी करण्याच्या त्याच्या अप्रोचबद्दल रोहितला सुनावलं. आयपीएलमध्ये त्याच्या अशा कामगिरीमुळे त्याने स्वत: जो वारसा तयार केला आहे, त्याला धक्का बसत असल्याचे सांगितले आहे.

सेहवाग म्हणाला, “तुम्ही जर गेल्या १० वर्षातील रोहित शर्माचे आयपीएलमधील आकडे पाहिले तर त्याने फक्त एकदाच ४०० धावांचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे मला ५००-७०० धावा करायलाच हव्यात अशा विचार करणारा तो खेळाडू नाहीये, जर त्याने असा विचार केला तर तो या धावा करू शकतो. जेव्हा त्याने भारताचे कर्णधारपद स्वीकारले होते, तेव्हा तो म्हणाला होता की, मला असा खेळाडू बनायचं आहे जो पॉवरप्लेमध्ये वादळी फलंदाजी करेल. परंतु त्याला हे कळत नाहीये की तो दिवसाच्या शेवटी जेव्हा कामगिरी करत नाही तेव्हा त्याच्या आजवरच्या कामगिरीला धक्का बसतो.”

पुढे रोहित म्हणाला, “आता त्याची जाण्याची वेळ आली आहे आणि निवृत्त होण्यापूर्वी चाहत्यांनी तुला कायम लक्षात ठेवावं यासाठी तू काहीतरी करणं गरजेचं आहे. रोहित चांगला खेळत नाहीये याला संघातून ड्रॉप का करत नाहीयेत असा विचार करायला लावण्याचे क्षण त्या चाहत्यांना नक्कीच द्यायचे नाहीत.”

सेहवाग पुढे म्हणाला, “तू १० चेंडू जास्तीचे घे, पण कमीत कमी मैदानावर राहून खेळ आणि स्वत:ला संधी दे. रोहित बऱ्याचदा पूल शॉटवर बाद होतोय. त्यामुळे त्याने ठरवलं पाहिजे की मी एका खेळीत पूल शॉटचं मारणार नाही. पण त्याला हे सांगणार कोण? त्याला कोणीतरी सांगायला हवं की तू नॉर्मल क्रिकेट खेळ. मी जेव्हा अशा स्थितीतून जायचो तेव्हा मला सांगायला तिथे सचिन, द्रविड आणि गांगुली होते जे मला नॉर्मल क्रिकेट खेळ असं सांगायचे.”

रोहित शर्मा आता आयपीएल २०२५ मधील पुढील सामन्यांमध्ये कशी कामगिरी करणार यावर सर्वांच्या नजरा आहेत. सनरायझर्स हैदराबादविरूद्ध सामन्यात रोहित शर्माचा पूल शॉट आणि त्याचे इतर काही फटके पाहता तो आपल्य फॉर्मात परतत असल्याचे संकेत मिळाले आहेत.