स्वत:ची एक ओळख निर्माण झाली असली तरी आपण आपल्या आदर्शवत व्यक्तींना कधीच विसरत नाही. काही वेळेला आपल्याला त्यांच्यासारखं होण्याची सुप्त इच्छा असते, अशीच एक इच्छा होती ती मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची. ‘‘सर विवियन रिचर्ड्स आणि सुनील गावस्कर यांच्या खेळाचा मिलाफ साधणारा खेळाडू व्हायचे होते’’ असे वक्तव्य सचिनने एका कार्यक्रमात केलं.
‘‘प्रत्येकाला स्वत:ची ओळख आवडत असते आणि ते महत्त्वाचे आहे. प्रत्येकाचे कुणी ना कुणी आदर्श असतात. जेव्हा मी लहान होतो तेव्हा सर विवियन रिचर्ड्स आणि सुनील गावस्कर हे माझे आदर्श होते, मला लहान असताना त्यांच्यासारखे व्हायचे होते. तुमचे काही आदर्श असतील, त्यांच्या जवळ आपण कसे पोहोचू शकतो याचा विचार करा,’’ असे सचिन आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना म्हणाला.
तो पुढे म्हणाला की, ‘‘तुमचे क्रिकेटवर प्रेम असणे महत्त्वाचे आहे. जेव्हा तुमचे क्रिकेटवर खरे प्रेम असते, तेव्हा तुम्ही सराव करताना किती तास झाले, चेंडू किती खेळलो हे कधीही पाहात नाही. घडय़ाळाकडे तुमचे कधीही लक्ष जात नाही. मी जेव्हा तुमच्या वयाचा होतो, तेव्हा सकाळी ७.३० वाजल्यापासून संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत सराव करत असायचो. माझ्या प्रशिक्षकांनी माझ्यावर अथक मेहनत घेतली. क्रिकेटची आवड माझी अजूनही कायम आहे, तुमच्यापैकी ज्यांना क्रिकेटपटू व्हायचेय त्यांना क्रिकेटबद्दल प्रेम असायला हवे.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा