बुधवारी आयपीएल २०२३मध्ये एलिमिनेटर सामना खेळला गेला. ज्यामध्ये मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचे संघ आमनेसामने होते. मुंबई इंडियन्सने चमकदार कामगिरी करत लखनऊला ८१ धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत करून क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला. मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला आकाश मधवाल ज्याने ५ धावांत ५ विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. सामना संपल्यानंतर एमआयचा मेंटॉर सचिन तेंडुलकरने आकाशचे पाच शब्दांत कौतुक केले. चला जाणून घेऊया सचिन तेंडुलकर काय म्हणाला.
सचिन तेंडुलकरने आकाश मधवालचे जोरदार कौतुक केले
कालचा सामना मुंबई इंडियन्ससाठी करा किंवा मरा असा होता. ज्यामध्ये २९ वर्षीय इंजिनिअर-क्रिकेटर आकाश मधवालच्या शानदार कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सने ८१ धावांनी विजय मिळवला. या कामगिरीनंतर भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरनेही आकाशचे कौतुक केले. एमआय फ्रँचायझीने त्यांच्या अधिकृत यूट्यूब अकाऊंटवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. ज्यामध्ये नीता अंबानी यांनी दिग्गज सचिन तेंडुलकरला विजयानंतर छोटेसे भाषण देण्याची विनंती केली होती. तेंडुलकरने लखनऊविरुद्धच्या सामन्यातील मधवालचा सामना बदलणारा स्पेल “अविश्वसनीय” असल्याचे म्हटले.
पुढे बोलताना मास्टर-ब्लास्टर सचिन म्हणाला, “ग्रीन आणि सूर्या यांच्यातील भागीदारीने आमच्यासाठी एक मोठी धावसंख्या उभारण्यासाठी भक्कम पाया तयार केला. या मोठ्या मैदानावर १८२ ही चांगली धावसंख्या होती. गेल्या सामन्याच्या तुलनेत खेळपट्टी वेगळ्या पद्धतीने खेळली, पण जेव्हा आम्ही बाहेर पडलो तेव्हा असे वाटले की आम्ही १४५ धावांचा बचाव करत आहोत. मुंबईचे क्षेत्ररक्षण उत्तम होते त्यामुळेच आम्ही सामना जिंकू शकलो, हे अप्रतिम होते,”
“मला वाटले की बदोनीने तो शॉट खेळला (मधवाल विरुद्ध १०व्या षटकात), माझ्यासाठी तो खेळाचा टर्निंग पॉइंट होता,” तेंडुलकर त्याच्या ड्रेसिंग रूमच्या भाषणात म्हणाला, “होय, क्रुणालची विकेट आमच्यासाठी महत्त्वाची होती, मधवालच्या षटकातील त्या दोन विकेट्सने सामना बदलला. मधवालने त्या गोल्डन चेंडूवर त्याला तो शॉट खेळायला भाग पाडले. माझ्यासाठी तो टर्निंग पॉइंट होता. (आकाश मधवालकडे वळून) अविश्वसनीय, मधवाल. अप्रतिम कामगिरी केली अशीच पुढे सुरू ठेव.”
मधवालने आयपीएलच्या इतिहासात संयुक्तपणे सर्वाधिक पाच विकेट्स घेण्याचा विक्रम केला असून, भारताच्या महान अनिल कुंबळेची बरोबरी केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधित्व करताना कुंबळेच्या नावावर हा विक्रम आयपीएल २००९ मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध झाला होता.