MS Dhoni reveals secret of success : एमएस धोनी हा आयपीएलमधील महान आणि जुन्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे. वयाच्या ४२ व्या वर्षीही तो या मोसमात त्याच्या चेन्नई सुपर किंग्जसाठी प्रभावी कामगिरी करत आहे आणि लांबच लांब षटकार मारत आहे. तथापि, त्याच्या यश आणि फिटनेसमागील गुपिताबद्दल कधीही चर्चा झाली नाही. आता आयपीएलच्या अधिकृत प्रसारकाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये धोनीने खुलासा केला आहे की तो त्याच्या झोपेच्या वेळापत्रकाबद्दल खूप गंभीर आहे.तो म्हणाला की अनेकांनी याबद्दल त्याला वेड्यात काढले, पण त्याने त्यांचे कधीही ऐकले नाही. ज्यामुळे त्याला आयपीएल सामन्यांसाठी ताजे राहण्यास मदत झाली.
व्हिडीओमध्ये धोनी असे म्हणताना ऐकू येते की, “काही लोकांच्या मते, हे सर्वात खराब टाइम टेबलपैकी एक होते, परंतु गेल्या काही वर्षांत मला त्याचा फायदा झाला आहे. आयपीएल सुरू होण्याच्या पाच-सात दिवस आधी मी असा विचार करू लागतो आणि माझ्या मनाला तसं प्रशिक्षण देऊ लागतो. आमच्याकडे प्लस पॉइंट होता की आम्ही ती फ्लाइट पकडण्याचा प्रयत्न करायचो, जी १२ नंतर असायची.”
धोनीने सागितला सामन्यानंतरचा दिनक्रम –
धोनी पुढे म्हणाला, “मी खूप उशिरापर्यंत झोपायचो कारण जेव्हा सामने असतात, तेव्हा ते आठ ते अकरा-साडे अकरापर्यंत जातात. सामन्यानंतर सादरीकरणानंतर कोणताही खेळाडू त्याची किट बॅग पॅक करतो. त्यानंतर रात्री उशिरा जेवण होते. तुम्ही हॉटेलवर परत पोहोचता, तेव्हा रात्रीचे सुमारे एक किंवा सव्वा एक वाजलेले असतात. मग तुम्हाला तुमचे सामान हॉटेलमध्ये पॅक करायचे असते, किटची बॅग बाहेर ठेवायची असते आणि तुम्ही हे सर्व करुपर्यंत खूप उशीर झालेला असतो. जवळपास रात्रीचे सुमारे अडीच वाजलेल्या असतात.”
एमएस धोनी किती वाजता झोपतो?
लोकांची झोपेची वेळ सहसा रात्री १० ते ६ किंवा ११ ते ७ अशी असते, परंतु धोनीसाठी ती पहाटे ३ ते सकाळी ११ पर्यंत असते. कारण आयपीएलचे सामने खूप काळ चालतात. माही म्हणाला, “त्यामुळे रात्री १० ते ६ किंवा सकाळी ११ ते ७ झोपण्याऐवजी मी सकाळी ३ ते ११ झोपायचो. त्यामुळे मला किमान आठ तासांची झोप नक्कीच मिळते. मला नेहमी रात्री चांगला आराम करु दिला जात होता. त्यामुळे आयपीएलचा हंगाम संपल्यानंतर कधीही थकवा जाणवला नाही.”
हेही वाचा – IPL 2024: राजस्थान रॉयल्सने १६ गुण मिळवूनही प्लेऑफचे तिकीट का मिळाले नाही? काय आहे नेमकं कारण
धोनीची आयपीएल २०२४ मधील कामगिरी –
वयाच्या ४२ व्या वर्षीही धोनीचा या हंगामात फिटनेस अप्रतिम आहे. त्याने सहा डावात ९१ धावा केल्या आहेत, पण त्याचा स्ट्राईक रेट २६० आहे. तो शेवटच्या षटकात येऊन झटपट धावा करण्यात तरबेज आहे. याशिवाय तो विकेटकीपिंगही करत आहे. गेल्या हंगामानंतर धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हापासून तो या हंगामात अप्रतिम फलंदाजी करत आहे. त्याचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो, असे मानले जात आहे.