Sachin Tendulkar arrives in Goa to celebrate his birthday:सचिन तेंडुलकर २४ एप्रिल रोजी त्याचा ५० वा वाढदिवस साजरा करणार आहे. तो या खास दिवसाचा आनंद आपल्या कुटुंबीयांसह आणि नातेवाईकांसोबत घेणार आहे. सचिन तेंडुलकरची बर्थडे पार्टी गोव्यात आहे, त्यासाठी तो पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगी सारा तेंडुलकसह गोव्यात पोहोचला आहे.
क्रिकेटचा देव म्हटला जाणारा सचिन तेंडुलकर सोमवारी ५० वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्यासाठी तो मुंबईहून गोव्याला पोहोचला आहे. तत्पुर्वी मुंबईत शनिवारी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात रोमांचक सामना झाला. या सामन्यासाटी सचिनही उपस्थित होता. त्याने मुंबई आणि पंजाब संघाच्या सामन्यानंतर आपला वाढदिवस साजरा केला. सचिनने स्टेडियममध्ये मोठा केकही कापला. विशेष म्हणजे यावेळी सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे.
सोमवारी सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसाची होणार पार्टी –
पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगी सारा तेंडुलकर यांच्यासह सचिन तेंडुलकरचे काही जवळचे नातेवाईक गोव्यात पोहोचले आहेत. कडेकोट बंदोबस्तात सचिनही गोव्यात पोहोचला आहे. सोमवारी ते गोव्यात वाढदिवस साजरा करणार आहेत. सचिन तेंडुलकरचा जन्म मुंबईतील दादर निर्मल नर्सिंग होममध्ये झाला. सचिन तेंडुलकरच्या वडिलांनी त्याचे नाव संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन यांच्या नावावर ठेवले. सचिन तेंडुलकरच्या कुटुंबात दोन मोठे भाऊ आणि एक बहीण आहे.
सचिन तेंडुलकरची कारकीर्द –
१९८९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सचिन तेंडुलकरने २०१३ मध्ये फेअरवेल मॅच खेळली होती. २४ वर्षांच्या कारकिर्दीत सचिन तेंडुलकरने अनेक विक्रम केले, जे आजही तोडणे कठीण आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २०० कसोटी, ४६३ एकदिवसीय आणि १ टी-२० सामना खेळला. ज्यामध्ये त्याने अनुक्रमे कसोटीत १५९२१, वनडेत १८४२६ आणि टी-२० मध्ये १० धावा केल्या आहेत. त्याचबरोबर सचिन हा शतकांचे महाशतक झळकावणारा एकमेव क्रिकेटपटू आहे.