‘आक्रमक फलंदाजीविषयी तुम्ही बोलत आहात. आमच्याकडे स्फोटक फलंदाजांची मोठी फळी आहे. तुमचा प्रश्नच मला समजलेला नाही. पहिल्या चेंडूपासून आम्ही प्रतिस्पर्धी गोलंदाजांची कत्तल करायला घेत नाही म्हणजे आमच्याकडे ती क्षमता नाही असं नव्हे. थोडं थांबा, नशिबाची साथ मिळू द्या, आयपीएल कोण जिंकतंय ते बघा. आम्हाला निकाली काढू नका’, असं चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग म्हणाले. शुक्रवारी चेन्नईला १७ वर्षानंतर घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवाचा सल फ्लेमिंग यांच्या बोलण्यात जाणवला.

चेपॉकवर खेळताना आम्हाला कोणताही होम अॅडव्हांटेज मिळत नाही असं फ्लेमिंग यांनी स्पष्टच सांगितलं. शुक्रवारी आरसीबीने चेन्नईचा गड १७ वर्षांनी भेदत ५० धावांनी विजय मिळवला. बाकी संघ पॉवरप्लेच्या ६ षटकांचा फायदा उठवत जास्तीत जास्त धावा लूटतात. चेपॉकची खेळपट्टी संथ आणि धीमी आहे. या खेळपट्टीवर धावा करणं सोपं नाही. त्यामुळे २००पल्याड धावसंख्या जात नाही.

पत्रकार परिषदेदरम्यान फ्लेमिंग यांना विचारण्यात आलं की, पहिल्या सामन्यात तुम्ही १५६ धावांचा पाठलाग केलात पण तोपर्यंत २०वं षटक सुरू झालं होतं. आरसीबीविरुद्ध तुम्ही १४६ धावा केल्यात. तुम्ही यापद्धतीने क्रिकेट खेळता. ही तुमच्या संघाची शैली आहे. पण ही शैली कालबाह्य झाली आहे असं तुम्हाला वाटत नाही का?

यावर फ्लेमिंग यांच्याकडून प्रत्युतर मिळालं. आमच्या पद्धतीचं क्रिकेट म्हणजे काय? पत्रकाराने नेमकं काय म्हणायचंय ते समजावून सांगितलं. बाकी संघ पहिल्या चेंडूपासून जोरदार फटकेबाजीला सुरुवात करतात. पॉवरप्लेच्या ६ षटकात शंभरी गाठण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यावर फ्लेमिंग म्हणतो, ‘आमच्याकडे आक्रमक पवित्र्याने खेळणारे खेळाडू नाहीत असं नाही. आमच्याकडे नवव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी आहे. तुमचा प्रश्नच मला कळत नाही. पहिल्या चेंडूपासून आम्ही गोलंदाजांची लक्तरं वेशीवर टांगत नाही म्हणजे आम्हाला ते जमत नाही असं नाही. थोडं नशीब आमच्या बाजूने वळू द्या, आयपीएल कोण जिंकतंय ते बघा’.