IPL 2025 Vighnesh Puthur MS Dhoni Video: आयपीएलमधील पदार्पणाच्या सामन्यातच मुंबई इंडियन्स संघाचा नवा गोलंदाज सर्वांच्या परिचयाचा झाला आहे. मुंबई इंडियन्सचा फिरकी गोलंदाज विघ्नेश पुथूर सध्या चर्चेचा विषय आहे. आयपीएलमधील पहिल्याच आणि तेही चेन्नई सुपर किंग्सविरूद्धच्या सामन्यात ३ विकेट घेत सीएसकेला धक्के दिले होते. विघ्नेश पुथूरच्या कमालीच्या गोलंदाजीमुळे सीएसकेच्या धावांना ब्रेक लागला होता, पण अखेरीस सीएसके संघाने सामना जिंकला, पण विघ्नेशच्या कामगिरीने सर्वांचं मन जिंकलं होतं. ज्यात धोनीचा देखील समावेश होता.

मुंबई इंडियन्सकडून पदार्पणात कमीलीची कामगिरी केल्यानंतर सामन्यानंतर धोनी विघ्नेशची पाठ थोपटताना दिसला. दरम्यान तो धोनी त्याला प्रश्न विचारत त्याच्याशी बोलताना दिसला, त्यामुळे सर्वांना प्रश्न पडला होता की, धोनी विघ्नेशशी नेमकं काय बोलला? आता इंडियन एक्सप्रेसला त्याच्या मित्राने दिलेल्या मुलाखतीत त्याने याबद्दल सांगितलं.

विघ्नेश पुथूरचा जीवलग मित्र श्रीरागने त्याला मुंबई-चेन्नईच्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी फोन करत सर्वांच्या मनात असलेला तो प्रश्न विचारला. श्रीरागने विघ्नेशशी बोलणं होताच विचारलं, “(एड्डा, पुल्ली एंथा दा परांचू?) एमएस धोनी काय म्हणाला? मी ही पहिली गोष्ट विचारली कारण माझ्या पालकांनाही हे जाणून घेण्याची उत्सुकता होती,” श्रीराग म्हणाला.

श्रीराग विघ्नेशच्या उत्तराबाबत सांगताना म्हणाला, “धोनीने त्याला विचारले की तुझं वय किती आहे आणि विघ्नेशला सांगितलं की अशीच कामगिरी करत राहा असाच खेळत राहा, ज्यामुळे तो आयपीएलमध्ये येऊ शकला आहे.”

मलप्पुरममधील पेरिंथलमन्ना शहरातील कुन्नापल्ली भागात ऑटो रिक्षाचालक असलेले २४ वर्षीय विघ्नेशचे वडील बाबू यांना जवळपास सर्वांनीच धोनीबाबतचा प्रश्न त्यांना विचारला. विघ्नेश आणि त्याचा जवळचा मित्र श्रीराग याला शहरातील फार कमी लोक ओळखतात. श्रीराग हा विघ्नेशला त्याच्या बाईकवरून ट्रेनिंग सेशनला घेऊन जात असे आणि मासे मिळत असलेल्या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये हे दोघे जात असत.

विघ्नेश खूप लाजाळू मुलगा, मित्राने सांगितला कसा आहे विघ्नेश पुथूर

श्रीराग म्हणाला, “तुम्ही त्याच्याशी बोललात तर तुमचा विश्वास बसणार नाही की तो इतका प्रतिभावान आहे. तो खूप लाजाळू आणि अंतर्मुख मुलगा आहे. तो फारसा बोलत नाही… पण जेव्हा चेंडू त्याच्या हातात येतो तेव्हा तो पूर्णपणे वेगळा दिसतो. काल रात्री जगाला हे पाहायला मिळाले.” विघ्नेशचे बालपणीचे प्रशिक्षक सीजी विजयकुमार यांचेही असेच मत आहे. तो १० वर्षांचा असल्यापासून विघ्नेशची गोलंदाजी पाहत आहेत आणि तो गौतम गंभीरचं नाव असलेली केकेआरची जर्सी घालून गोलंदाजी करत असे.

विघ्नेश पुथूरचे बालपणीचे कोच नेमकं काय म्हणाले?

विजयकुमार म्हणाला, “जेव्हा एखादा मुलगा आमच्या अकादमीत सामील होतो, तेव्हा आम्ही त्याला सर्व गोष्टी आजमवायला देतो, फलंदाजी, विकेटकीपिंग, वेगवान गोलंदाजी, फिरकी. पण विघ्नेश सुरुवातीपासूनच रिस्ट स्पिन करायचा कारण त्याचे मनगट रबरासारखे होते आणि ॲक्शन खूप चांगली होती. रिस्ट स्पिनर असणं ही एक कला आहे आणि ती शिकण्यासाठी लागणारे कौशल्य त्याच्याकडे होते. पहिली छाप नेहमीच महत्त्वाची असते आणि त्याने चेन्नईमध्ये काय केले ते आपण सर्वांनी पाहिलं”

विघ्नेश पुथूर कसा झाला चायनामन फिरकीपटू गोलंदाज?

विघ्नेशचे शेजारी शरीफ यांनी मनगटाच्या फिरकी गोलंदाजीची कल्पना सर्वप्रथम दिली त्याला दिली. शरीफ त्याच्या गोलंदाजीबद्दल म्हणाले, “आम्ही एकत्र खेळायचो. मला लेगस्पिन गोलंदाजी करायला आवडायची, पण मी ते करू शकलो नाही,” शरीफ यांनी वयोगट पातळीनंतर खेळणे सोडले. म्हणून मी त्याला अशी गोलंदाजी करण्याचे प्रयत्न करायला सांगितले आणि टेनिस बॉलने त्याला चांगले टर्न मिळत होता. मी त्याला कॅम्पमध्ये घेऊन जायचं ठरवलं आणि त्याच्या पालकांनाही सांगितले की जर त्याने गंभीरपणे क्रिकेट खेळायला सुरुवात केली तर तो चांगली कामगिरी करेल.”

विघ्नेश पुथूरला अस्थमाची होती समस्या

वयाच्या १५ व्या वर्षी, विघ्नेश जॉली रोव्हर्स फर्स्ट इलेव्हनकडून खेळत होता, ज्याचे नेतृत्व केरळचे माजी खेळाडू शबिन पाशा करत होते. पाशा यांनी सांगितले की, “त्याला दमाचा थोडासा त्रास होता आणि KCL (केरळ प्रीमियर लीग) दरम्यान तो त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये होता असे दिसत नव्हते. MI स्काउट्सने त्याची गुणवत्ता ओळखली आणि जेव्हा तो चाचण्यांसाठी गेला तेव्हा आम्हाला थोडा विश्वास होता की त्याला लिलावात खरेदी केले जाईल कारण त्याच्याकडे टी-२०मध्ये यशस्वी होण्यासाठी कौशल्य आहे.”