IPL 2025 What is ESA Day MI vs LSG: मुंबई इंडियन्सचा संघ लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध वानखेडेच्या मैदानावर सामना खेळत आहे. आयपीएल २०२५ मधील चॅम्पियन संघ असलेल्या मुंबई इंडियन्ससाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे, कारण आज ESA Day साजरा केला जात आहे. लखनौ विरुद्धच्या सामन्यात, मुंबई इंडियन्स फ्रँचायझी एका खास उपक्रमासह मैदानात उतरली आहे. मुंबई संघाचा हा सामना पाहण्यासाठी १९ हजार गरीब मुलं मैदानात उपस्थित आहेत.
आज मुंबई इंडियन्सचा सामना पाहण्यासाठी १९ हजार मुलं वानखेडे स्टेडियमवर पोहोचली आहेत, ज्यांना त्यांच्या आदर्श खेळाडूंना थेट खेळताना पाहता येईल आणि स्टेडियममधून त्यांना पाठिंबा देत आहेत. मुंबई इंडियन्स संघाकडून ईएसए दिन उपक्रम पहिल्यांदा २०१० मध्ये आयोजित करण्यात आला होता. पण ESA Day नेमका काय आहे, जाणून घेऊया.
काय आहे ESA Day? ESA शब्दाचा फुल फॉर्म काय?
ESA Day हा दिवस रिलायन्स फाउंडेशन आणि मुंबई इंडियन्सचा उपक्रम एज्युकेशन अँड स्पोर्ट्स फॉर ऑल (ESA) याचा एक भाग आहे. या दिवशी, एमआय शहरातील आणि एनजीओमधील मुलांना लाईव्ह सामना पाहण्यासाठी आणि त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आमंत्रित करते.
२०१० मध्ये, मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांनी एजुकेशन एंड स्पोर्ट्स फॉर ऑल म्हणजेच ESA ला प्रोत्साहन देण्यासाठी एक उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत, फ्रँचायझी वेगवेगळ्या मुलांना मोफत सामना पाहण्याची संधी देते. यावेळी सुमारे १९,००० मुले खेळाडूंशी संवाद साधताना आणि वानखेडे स्टेडियमच्या वातावरणाचा आनंद घेत आहेत. पहिल्यांदाच मुले लाईव्ह क्रिकेट सामना पाहण्यासाठी आली आहेत.
मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट्स गमावत २१५ धावा केल्या आहेत. रायन रिकल्टन आणि सूर्यकुमार यादव यांनी उत्कृष्ट अर्धशतकी खेळी करत संघाच्या चांगल्या धावसंख्येचा पाया रचला. तर कार्बिन बॉश आणि नमन धीर यांना चांगला फिनिश देत २१५ धावांचा टप्पा गाठला.