कर्णधार गौतम गंभीरने विराट कोहलीशी घेतलेला पंगा, सलग दोन पराभव या पाश्र्वभूमीवर विजयाची हॅट्ट्रिक नोंदविणाऱ्या हैदराबाद सनरायजर्सविरुद्ध गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सचे नशीब उजळणार का? याचीच उत्सुकता लागून राहिली आहे. घरच्या मैदानावर सव्वाशेर असलेला कोलकाता आणि पदार्पणाच्या मोसमात कामगिरीत सातत्य राखणारा हैदराबाद हे संघ रविवारी एकमेकांशी भिडणार आहेत.
कोलकाताने सलामीच्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध विजय मिळवून आयपीएलच्या सहाव्या मोसमाची सुरुवात थाटात केली. पण कामगिरीत सातत्य राखता न आल्याने त्यांना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभवाचे तोंड पाहावे लागले. गेल्या सामन्यात ख्रिल गेलने ५० चेंडूंत नाबाद ८५ धावांची खेळी करत कोलकाताच्या गोलंदाजांची पुरती धुलाई केली होती. मात्र लागोपाठचे दोन्ही पराभव विसरून कोलकाताला आता कामगिरीत सुधारणा करावी लागेल. त्यामुळे रविवारच्या सामन्यात कोलकाता संघात बदल होण्याची अपेक्षा आहे. सनरायजर्सची फलंदाजी पाहता, कोलकाता संघ वेगवान गोलंदाज ब्रेट लीला संधी देईल. ईडन गार्डन्सच्या धीम्या गतीच्या खेळपट्टीवर कोलकाताची मदार पुन्हा एकदा जादुई फिरकीपटू सुनील नरिन याच्यावरच असणार आहे.
कोलकाताचा सलामीवीर ब्रेंडन मॅक्युलम दुखापतीतून सावरला असून या सामन्यात तो परतण्याची शक्यता आहे. मॅक्युलम परतल्यास, चार परदेशी खेळाडूंच्या नियमामुळे कुणाला संधी द्यायची, हा पेच कोलकाताच्या संघ व्यवस्थापनाला सोडवावा लागणार आहे. मॅक्युलम परतल्यास, इऑन मॉर्गनला विश्रांती मिळणार आहे. जॅक कॅलिस फलंदाजी आणि गोलंदाजीतही चांगली कामगिरी करत आहे.
सनरायजर्सकडे दिग्गज खेळाडूंचा भरणा नसला तरी जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज डेल स्टेनच्या साथीने इशांत शर्मा, थिसारा परेरा आणि लेगस्पिनर अमित मिश्रा गोलंदाजीत चमक दाखवत असल्यामुळे हैदराबादची स्वारी सुसाट आहे. या गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीमुळे हैदराबादने प्रतिस्पध्र्याना कमी धावसंख्येवर (१२८, १३०, ११४) रोखण्यात यश मिळवले. पण हैदराबादचे फलंदाज मोठी धावसंख्या उभारतीलच, असे नाही. गेल्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सचे ११४ धावांचे माफक आव्हान पेलतानाही हैदराबादची तारांबळ उडाली होती. त्यामुळे फलंदाजीची समस्या त्यांना लवकरात लवकर सोडवावी लागणार आहे.
कर्णधार कुमार संगकाराने फलंदाजीत मोठे योगदान द्यावे, अशी अपेक्षा आहे. शिखर धवन या सामन्यासाठी संघात सामील होण्याची अपेक्षा आहे. धवनच्या समावेशामुळे हैदराबादची फलंदाजी मजबूत होणार आहे. हैदराबादकडून एकमेव अर्धशतक झळकावले आहे ते कॅमेरून व्हाइटने. त्यामुळे अन्य फलंदाजांनाही उपयुक्त योगदान द्यावे लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा