इंडियन प्रीमिअर लीगचा हंगाम ऐन भरात असताना सख्खे शेजारी पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीग सुरू झाली आहे. दरवर्षी ही स्पर्धा फेब्रुवारी-मार्च महिन्यात होते. यंदा मात्र आयपीएल सुरू असतानाच पीएसएलचेही सामने सुरू आहेत. आयपीएल लिलावात नाकारलेले जवळपास तीन डझन खेळाडू पाकिस्तानात दाखल झाले आहेत.
आयपीएल काळात बाकी मालिका नसल्याने लिलावात अनसोल्ड ठरलेल्या खेळाडूंना पीएसएलच्या निमित्ताने आपला खेळ दाखवण्यासाठी व्यासपीठच मिळालं आहे. दरम्यान आयपीएलच्या सामन्यांच्या वेळातच पीएसएलचे सामने होत आहेत. पीएसएलच्या संयोजकांनी सामने रात्री ८ऐवजी ९ वाजता सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्पर्धेचे सामने कुठे पाहता येतात?
पाकिस्तान सुपर लीगचे सामने भारतात टीव्हीवर सोनी लिव्ह वाहिनीवर पाहता येतात. ऑनलाईन स्ट्रीमिंग फॅनकोड अॅपवर असणार आहे.
लीग कधीपासून सुरू झाली?
२०१५ मध्ये पाकिस्तान सुपर लीगची सुरुवात झाली.
लीगचं आयोजन कधी असतं?
दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्याच लीगचं आयोजन होतं. मात्र यंदा आयपीएल काळात म्हणजे मार्च ते मे महिन्यातच लीगचं आयोजन करण्यात आलं आहे.
विजेत्या संघाला बक्षीस रक्कम किती मिळते?
पाकिस्तान सुपर लीग विजेत्या संघाला ४ कोटी बक्षीस रकमेने गौरवण्यात आलं.
लीगची रचना कशी आहे?
राऊंड रॉबिन पद्धतीने लीगचे सामने होतात. अव्वल चार संघ बाद फेरीत प्रवेश करतात.
कुठल्या संघाने सर्वाधिक वेळा जेतेपद पटकावलं आहे?
इस्लामाबाद युनायटेड संघाने सर्वाधिक म्हणजे तीनवेळा जेतेपद पटकावलं आहे.
सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक विकेट्स कोणाच्या नावावर?
स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमच्या नावावर आहेत. वहाब रिझायच्या नावावर स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स आहेत. यंदाच्या हंगामात हसन अली वहाबचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.
ग्रीन आणि मरुन कॅप कोणाला मिळते?
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप आणि सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्या गोलंदाजाला परपल कॅप मिळते. याच धर्तीवर पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ग्रीन कॅप मिळते. महान फलंदाज हनीफ मोहम्मद यांच्या नावाने हा पुरस्कार देण्यात येतो. सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्या गोलंदाजाला मरुन कॅपने सन्मानित करण्यात येतं. फझल मेहमूद यांच्या गौरवार्थ हा पुरस्कार देण्यात येतो. कामरान अकमल, ल्यूक राँकी, शेन वॉटसन, बाबर आझम, फखर झमान, मोहम्मद रिझवान यांनी ग्रीन कॅप पटकावली आहे. सोहेल खान, फहीम अशरफ, हसन अली, शाहीन शहा आफ्रिदी, शाहनवाझ धानी, अब्बास आफ्रिदी, उसामा मीर यांनी मरुन कॅप पटकावली आहे. स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या यष्टीरक्षकाला गौरवण्यात येतं.
लीगमध्ये किती संघ?
पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहा संघ आहेत. इस्लामाबाद युनायटेड, कराची किंग्ज, लाहोर क्वॅलँडर्स, मुलतान सुलतान, पेशावर झाल्मी आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स असे सहा संघ आहेत.