आयपीएल २०२५ मध्ये सर्वच संघांमध्ये अनेक प्रतिभावान नवीन खेळाडू सामील झाले आहेत. हे नवे खेळाडू आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर आपली छाप पाडत आहेत. दरम्यान आयपीएल २०२५ सुरू असतानाचा कोलकाता नाईट रायडर्स म्हणजेच केकेआरच्या ताफ्यात एक नवा खेळाडू दाखल झाला आहे. ज्याची सगळीकडे चर्चा आहे.

आयपीएल-२०२५ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाची कामगिरी संमिश्र राहिली आहे. केकेआरने आयपीएलच्या १८ व्या हंगामात खेळलेल्या ५ पैकी २ सामन्यात विजय मिळवला आहे, तर तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. लखनौ सुपरजायंट्सविरुद्धच्या घरच्या मैदानावरील पराभवानंतर, केकेआरने त्यांच्या संघात एका युवा अष्टपैलू खेळाडूची भर घातली आहे.

केकेआरने इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमधील सर्वात महागडा खेळाडू अभिषेक दलहोरला नेट बॉलर म्हणून ताफ्यात सामील केलं आहे. आयएसपीएलमध्ये, अभिषेक अमिताभ बच्चन यांच्या मालकीच्या माझी मुंबई संघाकडून अभिषेक खेळला. दरम्यान त्याचा संघ विजेतेपद जिंकण्यातही यशस्वी झाला.

अभिषेकने स्पर्धेत त्याच्या वेग आणि सामना जिंकण्याच्या क्षमतेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. अंबाला येथे जन्मलेल्या या क्रिकेटपटूने १९ सामन्यांमध्ये ३२४ धावा केल्या आणि ३३ विकेट्स घेतल्या. त्याच्या या उत्कृष्ट योगदानामुळे त्याला पहिल्या सत्रात स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार आणि दुसऱ्या सत्रात सर्वोत्तम गोलंदाजाचा पुरस्कार मिळाला.

हरियाणाच्या गल्ली क्रिकेटपासून ते आयएसपीएलच्या मोठ्या मंचापर्यंत आणि आता आयपीएल इकोसिस्टममध्ये प्रवेश करत, अभिषेक डल्होरचा प्रवास आयएसपीएल तळागाळात क्रिकेटमध्ये कशी क्रांती घडवत आहे, याचे एक उत्तम उदाहरण आहे. देशातील आघाडीची टेनिस बॉल टी-१० क्रिकेट लीग म्हणून, आयएसपीएल तरुणांना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. आयएसपीएलमधील माझी मुंबई संघाचे मालक अमिताभ बच्चन यांनी अभिषेक डाल्होरची केकेआरचा नेट गोलंदाज म्हणून निवड झाल्याबद्दल त्याला शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली आहे.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली, केकेआरने या हंगामात एकूण ५ सामने खेळले आहेत, त्यापैकी २ सामने संघाने जिंकले आहेत. त्याच वेळी, ३ सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला. गेल्या सामन्यात लखनौने त्यांच्या घरच्या मैदानावर केकेआरचा ४ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना लखनौने ३ विकेट्स गमावल्यानंतर २३८ धावा केल्या. प्रत्युत्तरात, गतविजेत्या संघाला ७ विकेट गमावत फक्त २३४ धावा करता आल्या.