IPL 2024, DC vs PBKS Match Updates : आयपीएल २०२४ च्या दुसऱ्या सामन्यात शनिवारी पंजाब किंग्जचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी झाला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्ली कॅपिटल्सने २० षटकांत ९ गडी गमावून १७४ धावा केल्या. कर्णधार ऋषभ पंत इतर फलंदाजही काही खास करु शकले नाही. त्यामुळे दिल्लीचा संघ १५० धावांत गारद होईल असे वाटत होते, मात्र युवा फलंदाज अभिषेक पोरेलने दिल्लीचा डाव सावरला. त्याने २० व्या षटकात गोलंदाजी करायला आलेल्या हर्षल पटेलच्या षटकात चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. त्याने शेवटच्या षटकात २५ धावा कुटल्याने दिल्लीने पंजाबसमोर १७५ धावांचे लक्ष्य ठेवले. मात्र ही वादळी खेळी करणारा अभिषेक पोरेल कोण आहे? जाणून घेऊया.
नाणेफेक हारून प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्लीची सुरुवात अतिशय वेगवान झाली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी पहिल्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी केली. चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अर्शदीप सिंगने मार्शची विकेट घेतली. त्याने १२ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २० धावा केल्या. ७४ धावांवर दिल्लीला दुसरा धक्का बसला. धोकादायक दिसणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला हर्षल पटेलने आपला बळी बनवला. वॉर्नरने २१ चेंडूत २९ धावांची खेळी खेळली.
यानंतर शाई होपने २५ चेंडूत ३२ धावांची खेळी खेळली. सुमारे १५ महिन्यांनंतर पुनरागमन करणारा दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत मोठी खेळी खेळू शकला नाही आणि त्याने १३ चेंडूत १८ धावा केल्या. रिकी भुईने ७ चेंडूत केवळ ३ धावा केल्या. अशा प्रकारेदिल्लीने ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. यानंतर प्रभावशाली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या अभिषेक पोरेलने फलंदाजीत महत्त्वाचे योगदान दिले.
पंजाबसाठी शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या हर्षल पटेलच्या षटकात चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. अभिषेकने शेवटच्या षटकात २५ धावा केल्या. यादरम्यान त्याने ३ चौकार आणि २ शानदार षटकार मारले. ज्यामुळे दिल्लीला ९ बाद १७४ धावा करता आल्या. ज्यामध्ये अभिषेक पोरेलने १० चेंडूत नाबाद ३२ धावांचे योगदान दिले. पंजाब किंग्जकडून हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंगने २-२ विकेट्स घेतल्या. त्यांच्याशिवाय कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार आणि राहुल चहर यांनी १-१ विकेट घेतली.
कोण आहे अभिषेक पोरेल?
अभिषेक पोरेल हा बंगालचा युवा यष्टिरक्षक फलंदाज आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालचे प्रतिनिधित्व करतो. यष्टिरक्षण व्यतिरिक्त तो डाव्या हाताचा फलंदाज आहे. तो २०२२ वर्षी भारताच्या अंडर-१९ विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता. २०२२ मध्येच त्याने देशांतर्गत क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. त्याने रणजी करंडक पदार्पणात बडोद्याविरुद्ध अर्धशतक झळकावले.
हेही वाचा – Team India : ‘बीसीसीआयने कर्णधारपदाची ऑफर दिली होती पण धोनी…’, सचिन तेंडुलकरचं मोठं वक्तव्य
रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्येही त्याने अर्धशतक झळकावले होते. तो अतिशय प्रतिभावान खेळाडू मानला जातो. यानंतर मागील वर्षी दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी ऋषभ पंतच्या बदलीसाठी काही यष्टीरक्षकांच्या चाचण्या घेतल्या होत्या. त्यात अभिषेक पोरेलचाही समावेश होता. त्यानंतर त्याचा दिल्ली कॅपिटल्सच्या संघात समावेश करण्यात आला होता.