IPL 2025 Who is Ashutosh Sharma Delhi Capitals Match Winner: दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या इतिहासातील एका थरारक विजयाची नोंद केली आहे. लखनौविरूद्ध झालेल्या यंदाच्या पहिल्या सामन्यात दिल्लीने एका विकेटने अनपेक्षित विजय मिळवला आहे. लखनौने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीला विजयासाठी २१० धावांचे लक्ष्य दिले होते. १० षटकांच्या आत दिल्लीचा निम्मा संघ तंबूत परतला असला तरी खालच्या फळीतील फलंदाजांनी हार मानली नाही आणि दिल्लीने ३ चेंडू राखून लखनौवर एका विकेटने विजय नोंदवला. दिल्लीच्या विजयाचा हिरो ठरला आशुतोष शर्मा. पण हा नवा फिनिशर आहे तरी कोण? जाणून घेऊया.

आशुतोष शर्मा हे नाव आयपीएलमध्ये तसं नवीन नाही आणि त्याच्या कामगिरीचा प्रत्यय गतवर्षी सर्वांनीच घेतला. आशुतोष गेल्या वर्षी पंजाब किंग्सच्या ताफ्यात होता आणि २०२४ मध्ये गुजरात जायंट्स संघाविरूद्ध शशांक सिंगच्या मदतीने अशीच खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दिल्लीसाठी या सामन्यातही आशुतोष शर्मा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून उतरला होता आणि संघाचा मॅचविनर ठरला.

दिल्ली कॅपिटल्सने ६ विकेट्स गमावलेले असताना आशुतोष शर्मा इम्पॅक्ट प्लेअरच्या रूपात मैदानावर उतरला. आशुतोष शर्माने गतवर्षी आयपीएलमध्ये केलेल्या कामगिरीची सर्वांनाच कल्पना होती आणि दिल्लीला देखील त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा होती. आशुतोष शर्माने सुरूवातीला संथ सुरूवात केली, तोपर्यंत विपराज निगमने उत्कृष्ट फटके खेळत त्याला वेळ दिला आणि यानंतर दोघांनी मिळून संघाचा डाव सावरला. आशुतोषने विजयी षटकार लगावत संघाला ३ चेंडू राखून विजय मिळवून दिला.

आशुतोषने त्याच्या वादळी खेळीच्या जोरावर दिल्लीला आयपीएल इतिहासातील अनोखा विजय मिळवून दिला. आशुतोषने ३१ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली.

कोण आहे आशुतोष शर्मा?

आशुतोष शर्माचा जन्म १५ सप्टेंबर १९९८ ला रतलाम मध्यप्रदेशमध्ये झाला. आशुतोषला लहानपणापासूनच क्रिकेटची खूप आवड होती. आशुतोष एक उत्तम फलंदाज आणि गोलंदाजही आहे. त्याने मध्यप्रदेशकडून क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आशुतोष मध्यप्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याने मध्यप्रदेशसाठी अंडर-१६ पासून क्रिकेट खेळत आहे. आयपीएलमधील इम्पॅक्ट प्लेअर नियमामुळे आशुतोषला खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने आपल्या कामगिरीची छाप पाडली.

एका कोचच्या चुकीमुळे संघातून झाला बाहेर

पण २०२० मध्ये मध्यप्रदेश संघामधून त्याला बाहेर पडावे लागले. याबद्दल सांगताना आशुतोष २०२४ आयपीएलमध्ये म्हणाला होता, “२०१९ मध्ये मी पुद्दुचेरीविरुद्ध खेळताना माझ्या शेवटच्या सामन्यात एमपीसाठी ८४ धावा केल्या. त्यानंतर पुढच्या वर्षी, एक व्यावसायिक प्रशिक्षक आले आणि त्यांच्या स्वतःच्या आवडी-निवडी होत्या. त्यांना मी आवडत नसल्याने मला संघातून काढून टाकले. या घटनेने मी प्रचंड नैराश्यात गेलो होतो. त्यावेळी चंद्रकांत पंडित संघाचे कोच झाले होते.

यानंतर आशुतोषला त्याच्या लहानपणीच्या क्रिकेट कोचने साथ दिली. कोच भूपेन चौहान यांनी त्याच्या कठिण काळात त्याला साथ दिला. कोच यांच्या २०२३ मध्ये झालेल्या निधनानंतर त्याने रेल्वेकडून खेळण्याचा निर्णय घेतला. भारताचा माजी विकेटकिपर फलंदाज नमन ओझाने त्याला इथपर्यंत पोहोचण्यात मोठा पाठिंबा दिला.

आयपीएलमधील इम्पॅक्ट प्लेअर आशुतोषसाठी असा ठरला गेमचेंजर

आशुतोषने आयपीएल २०२४ मध्ये पंजाब किंग्स संघाकडून खेळला, तेव्हा त्याला त्याच्या मूळ किमतीला २० लाखांना संघात घेतले होते. २०२४ मध्ये त्याने १७ चेंडूत ३१ धावा, १५ चेंडूत ३३ धावा, १६ चेंडूत ३१ धावा आणि २८ चेंडूत ६१ धावा अशा विस्फोटक खेळी खेळत सर्वांचं लक्ष वेधलं. तरीही पंजाब संघाने त्याला आयपीएल २०२५ साठी रिटेन केलं नाही आणि त्याला लिलावात दिल्ली कॅपिटल्स संघाने ३.८० कोटींना विकत घेतले आणि त्याने पहिल्याच सामन्यात आपल्या कामगिरीने छाप पाडली.

आशुतोष शर्मा हा टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा भारतीय खेळाडू आहे. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधून रेल्वेकडून खेळताना ११ चेंडूत अर्धशतक झळकावले होते.