IPL 2025 Who is Ashwani Kumar Mumbai Indians Debutant: मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या आयपीएलमधील घरच्या मैदानावर पहिला सामना खेळत आहे. मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध वानखेडेच्या मैदानावर खेळवला जात आहे. भारताची भेदक गोलंदाजी करणारी गोलंदाजांची जोडगोळी बोल्ट आणि चहरने कहर केला. या दोघांनी दोन षटकांत केकेआरची अवस्था २-२ अशी केली. तर तिसऱ्या षटकात नव्या चेहऱ्याने पहिल्याच चेंडूवर विकेट घेत सर्वांचं लक्ष वेधलं. हा नवा गोलंदाज अश्वनी कुमार आहे तरी कोण, जाणून घेऊया.
केकेआरविरूद्धच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सकडून या सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये ३ बदल केले आहेत. विल जॅक्स आणि विघ्नेश पुथूर संघात परतले. तर नवा वेगवान गोलंदाज अश्वनी कुमारला पदार्पणाची संधी दिली.
केकेआरच्या डावातील दुसऱ्याच षटकात दीपक चहर गोलंदाजी करत होता. दीपकने या षटकात क्विंटन डी-कॉकला झेलबाद केलं. पण डी-कॉकचा कमालीचा झेल टिपणारा अश्वनी कुमार होता. अश्वनी कुमारने क्विंटनचा झेल टिपत मैदानात आपला परिच करवून दिला. यानंतर चौथ्या षटकात त्याला गोलंदाजीची संंधी देण्यात आली. या नवख्याने पहिल्याच चेंडूवर मुंबईकर अजिंक्य रहाणेची विकेट घेत धुमाकूळ घातला.
अश्वनीला सामन्यातील ११ वे षटक दिले. ज्यात त्याने सुरूवातीला रिंकू सिंगला झेलबाद केलं. तर अखेरच्या चेंडूवर मनिष पांडेला क्लीन बोल्ड करत मुंबईला मोठी विकेट मिळवून दिली. यानंतर केकेआरची अखेरची आशा असलेल्या आंद्रे रसेललाही त्याने १३व्या षटकात क्लीन बोल्ड केलं आणि केकेआरला न सावरणारा धक्का दिला. यासह त्याने ४ विकेट्स घेतले.
कोण आहे अश्वनी कुमार? (Who is Mumbai Indians Debutant Ashwani Kumar)
अश्वनी कुमार हा २३ वर्षीय वेगवान गोलंदाज आहे. जो पंजाबकडून खेळतो. पंजाबचा अश्विनी कटर, स्लो-बाऊंसर, फ्लोटिंग फुलटॉस आणि लेन्थ बॉल टाकण्यात माहिर आहे. अश्विन हर्षल पटेलप्रमाणे गोलंदाजी करतो. २०२५ च्या मेगा लिलावात, त्याला मुंबई इंडियन्सने ३० लाख रुपयांना खरेदी केले. २०२३ च्या शेर-ए-पंजाब ट्रॉफीमध्ये तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता, ज्यामुळे त्याने संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली होती. त्याच्या.या कामगिरीने एमआय स्काउट्सचे लक्ष वेधले गेले.
अश्वनी कुमारने २ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ३ विकेट्स घेतल्या आहेत, तर ४ लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याने ३ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ४ टी-२० सामने खेळले आहेत ज्यामध्ये त्याने २ विकेट्स घेतल्या आहेत.
आयपीएल पदार्पणात पहिल्याच चेंडूवर विकेट
इशांत शर्मा- राहुल द्रविड-२००८
विल्कीन मोटा- सुरेश रैना- २००८
शेन हारवूड- अझर बिल्खालिया- २००९
अमित सिंग- सनी सोहेल- २००९
चार्ल लँगव्हेल्डट- रॉब क्विनी- २००९
अली मुर्तझा- नमन ओझा- २०१०
टीपी सुधींद्र- फाफ डू प्लेसिस- २०१२
अल्झारी जोसेफ- डेव्हिड वॉर्नर- २०१९
मथिशा पथिराणा- शुबमन गिल- २०२२
अश्वनी कुमार- अजिंक्य रहाणे- २०२५