आयपीएलच्या नव्या हंगामात भारतीय खेळाडू छाप उमटवत आहेत. मंगळवारी लखनौ-पंजाब लढतीत अनोख्या केशरचनेच्या दिग्वेश राठीचं विकेट सेलिब्रेशनची सोशल मीडियावर चर्चा रंगली. हे सेलिब्रेशन त्याला महागात पडू शकतं का हे समजून घेऊया.

लखनौकडून खेळणाऱ्या दिग्वेश राठीने पंजाबच्या प्रियांश आर्याला बाद केलं. दिग्वेशला मोठा फटका खेळण्याचा प्रियांशचा प्रयत्न शार्दूल ठाकूरच्या हातात जाऊन विसावला. त्याने ८ धावा केल्या. दिल्लीकर मित्र असलेल्या प्रियांशच्या जवळ जात दिग्वेशने विकेटचं सेलिब्रेशन केलं. हातातल्या वहीत नाव लिहून काम फत्ते केल्याची खूण दिग्वेशने केली. प्रियांश काहीही न बोलता पॅव्हेलियनच्या दिशेने निघून गेला. काही मिनिटातच सोशल मीडियावर हे सेलिब्रेशन व्हायरल झालं.

या सेलिब्रेशनसाठी होऊ शकते का कारवाई?

आयपीएल कोड ऑफ कंडक्टनुसार अन्य खेळाडूला उद्देशून आक्षेपार्ह भाषा, हावभाव, खाणाखुणा यापैकी काहीही केल्यास कारवाई होऊ शकते. प्रतिस्पर्धी फलंदाजाला बाद केल्यानंतर त्याला उद्देशून टिप्पणी करणे तसंच त्याला ड्रेसिंगरुममध्ये जा हे खुणावणे या कलमांचा समावेश आहे. सामनाधिकारी खेळाडूचं वर्तन पाहून योग्य तो निर्णय घेतात. दिग्वेश सेलिब्रेशन करताना प्रियांशला उद्देशून काहीही बोलला नाही. दोघेही दिल्लीकर आहेत आणि एकमेकांना चांगले ओळखतात. त्यामुळे गंमतीत त्याने हे सेलिब्रेशन केलं. पण सामनाधिकारी याची दखल घेऊन कारवाई करू शकतात.

दिल्ली प्रीमिअर लीग स्पर्धेत चमकदार कामगिरी

गेल्या वर्षी दिल्ली प्रीमिअर लीग स्पर्धेत दिग्वेशने आपल्या कामगिरीने सगळ्यांनाच प्रभावित केलं. साऊथ दिल्ली संघाकडून खेळताना दिग्वेशने १० सामन्यात १४ विकेट्स पटकावल्या. ऋषभ पंतसारख्या अव्वल फलंदाजांनाही त्याने बुचकळ्यात टाकलं. दिग्वेशच्या गोलंदाजीची अॅक्शन वेस्ट इंडिज आणि कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या सुनील नरिनच्या शैलीशी साधर्म्य साधणारी आहे. दिल्ली प्रीमिअर लीगमधल्या कामगिरीने आयपीएल संघांच्या टॅलेंट स्काऊटने दिग्वेशला हेरलं. लिलावात लखनौ सुपरजायंट्स संघाने त्याला ३० लाख रुपये खर्चून संघात समाविष्ट केलं.

पदार्पणातही उमटवला ठसा

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध दिग्वेशने पदार्पण केलं. या लढतीत त्याने दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलला बाद केलं. अनुभवी अक्षर पटेलला बाद करून दिग्वेशने आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली. काही वेळात त्याने मिचेल स्टार्कला तंबूत धाडलं. लखनौकडे रवी बिश्नोईच्या रुपात अव्वल फिरकीपटू आहे. बिश्नोईच्या बरोबरीने दिग्वेशने लखनौला एक चांगला सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला आहे.