IPL 2025 SRH vs PBKS Who is Eshan Malinga: आयपीएलमध्ये पंजाब किंग्स वि. सनरायझर्स हैदराबाद सामन्यात नव्या गोलंदाजाने पदार्पण केले, ज्याने पदार्पणात २ विकेट्स घेतल्या आहेत. सनरायझर्स हैदराबादकडून इशान मलिंगाने आयपीएलमध्ये पदार्पण केले. कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेकीदरम्यान माहिती दिली. मलिंगाने प्लेइंग इलेव्हनमध्ये कामिंदू मेंडिसची जागा घेतली. पण हा इशान मलिंगा नेमका आहे तरी कोण?

इशान मलिंगला पंजाब किंग्सविरूद्ध सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. पंजाब किंग्सचे सलामीवीर या सामन्यात वादळी फटकेबाजी करत होते. मलिंगाला या सामन्यात सातवे षटक टाकण्याची संधी मिळाली आणि त्याने पहिल्याच षटकात महत्त्वाची विकेट आपल्या नावे केली. पंजाबचा सलामीवीर प्रभसिमरन सिंग २२ चेंडूत ४२ धावांवर खेळत होता, ज्याला इशान मलिंगाने झेलबाद करवत संघाला दुसरी विकेट मिळवून दिली. तर त्यानंतर त्याने नेहाल वधेराला पायचीत केले. पण बाद झाल्यानंतर काही वेळाने रिव्ह्यूमध्ये नेहाल नाबाद असल्याचे दिसले, पण तोपर्यंत खेळ पुढे सरकला होता.

इशान मलिंगा हा श्रीलंकेचा क्रिकेटपटू आहे. या हंगामात आयपीएलमध्ये खेळणारा तो पाचवा श्रीलंकेचा क्रिकेटपटू आहे. त्याच्याशिवाय कुसल मेंडिस, महिश थीक्षणा, मथीशा पथिराना आणि वानिंदू हसरंगा खेळले आहेत. २०२५ च्या आयपीएल लिलावात इशानला हैदराबादने १.२० कोटी रुपयांना खरेदी केले. आयपीएलमध्ये संधी मिळाल्यानंतर, ईशानला श्रीलंकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. त्याने आतापर्यंत पाच एकदिवसीय सामने खेळले आहेत ज्यात त्याने चार विकेट्स घेतल्या आहेत.

मलिंगा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो श्रीलंकेचा उत्कृष्ट वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा. पण इशानचा लसिथ मलिंगाशी काहीच संबंध नाही. तसेच, त्याची गोलंदाजी अॅक्शनही त्याच्यासारखी नाही. इशान हा एक वेगवान गोलंदाज आहे. तो आयपीएल २०२५ मधील दोन अनकॅप्ड परदेशी खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्याशिवाय न्यूझीलंडचा बेवन जेकब्स देखील अनकॅप्ड खेळाडू आहे.

इशान मलिंगा पहिल्यांदा २०१९ मध्ये चर्चेत आला होता. त्यानंतर त्याने श्रीलंकेत वेगवान गोलंदाजीची स्पर्धा जिंकली होती. यामध्ये त्याने १४१ किलोमीटर प्रति तास वेगाने गोलंदाजी केली. त्याच्याकडे नवीन चेंडू स्विंग करण्याची कला आहे. तो डेथ ओव्हर्समध्ये चांगले यॉर्करदेखील टाकतो. यामुळे, त्याला गोलंदाजीमध्ये एक संपूर्ण पॅकेज मानले जाते आणि येणाऱ्या काळात त्याला श्रीलंकेचा गोलंदाजीचा स्टार म्हटले जात आहे.

पाकिस्तानच्या हॅरिसला क्लीन बोल्ड करत आला होता चर्चेत

२०२४ मध्ये इमर्जिंग आशिया कपच्या उपांत्य सामन्यात इशान मलिंगाने पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद हॅरिसचा भन्नाट यॉर्करने त्रिफळा उडवत खळबळ उडवून दिली. या सामन्यात त्याने दोन विकेट घेतल्या आणि आपल्या संघाला अंतिम फेरीत पोहोचवले. मलिंगाने स्पर्धेत पाच सामन्यांत ६.३६ च्या इकॉनॉमीसह सहा विकेट्स घेतल्या होत्या.