SRH vs LSG Travis Head Wicket Prince Yadav IPL 2025: लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यात लखनौच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत हैदराबादच्या फटकेबाजीला लगाम घातला. मोठमोठी धावसंख्या उभारणारा हैदराबादचा संघ प्रथम फलंदाजी करताना लखनौसमोर २०० धावाही करू शकला नाही. पण या सामन्यात प्रिन्स यादवच्या गोलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधलं. आपल्या कमालीच्या लाईन आणि लेंग्थसह प्रिन्स यादवने ट्र्रॅव्हिस हेडला क्लीन बोल्ड केलं. पण हा नवा युवा गोलंदाज प्रिन्स यादव आहे तरी कोण? जाणून घेऊया.

पॉवरप्लेच्या अखेरच्या षटकात रवी बिश्नोई आणि निकोलस पूरन यांच्याकडून ट्रॅव्हिस हेडचे दोन झेल सुटले. दुसऱ्या टोकाकडून हैदराबादने अभिषेक शर्मा आणि इशान किशनची विकेट गमावली असली तरी हेड विस्फोटक फलंदाजी करत होता, त्यामुळे हैदराबादला रोखण्यासाठी हेडची विकेट महत्त्वाची होती. तितक्यात टाईमआऊटनंतर ऋषभ पंतने नव्या गोलंदाजाच्या हातात चेंडू दिला आणि प्रिन्स यादवने कमाल केली. तर डावातील १२व्या षटकात त्याच्या हाताला चेंडू लागल्याने नॉन स्ट्रायकर एंडवर हेनरिक क्लासेन धावबादही झाला.

ट्रॅव्हिस हेडला क्लीन बोल्ड करणारा प्रिन्स यादव आहे तरी कोण? (Who is LSG’s Pacer Price Yadav?)

लखनौचा हा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादव हा दिल्लीचा आहे. त्याचा जन्म नजफगढच्या दरियापूर गावात झाला आणि त्याने टेनिस बॉलने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. यानंतर तो स्पोर्टिंग क्लबमध्ये दाखल झाला आणि अमित वशिष्ठ यांच्याकडे त्याने क्रिकेटची धुळाक्षर गिरवली. दरम्यान, दिल्लीचा वेगवान गोलंदाज प्रदीप सांगवान आणि अष्टपैलू ललित लांबा यांनी प्रिन्स यादवला पुढे जाण्यास मदत केली.

उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवने दिल्ली प्रीमियर लीगद्वारे पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली. २०२४ च्या हंगामात, तो ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघ, पुरानी दिल्ली 6 कडून खेळला. जिथे त्याच्या चेंडूचा वेग बदलण्याच्या त्याच्या क्षमतेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दहा सामन्यांमध्ये १३ विकेट घेतल्यानंतर, त्याला दिल्ली संघात आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली, यापूर्वी त्याने दोन रणजी सामने खेळले होते.

२००१ मध्ये जन्मलेला, प्रिन्स दिल्ली प्रीमियर लीग 2024 (DPL 2024) मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा पाचवा खेळाडू होता. डीपीएलमध्येही त्याने हॅटट्रिक घेतली. या लीगमध्ये हॅटट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. सेंट्रल दिल्ली किंग्जविरुद्धच्या सामन्यात प्रिन्स यादवने हॅटट्रिक घेतली. सामन्याच्या १८व्या षटकात प्रिन्सने प्रथम केशव दाबासला बाद केले, जो डीपमध्ये झेलबाद झाला. त्यानंतर उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने सुमित कुमारला पायचीत केले. त्यानंतर फुल टॉसवर पायचीत झालेल्या हरीश डागरला बाद करून त्याने हॅट्ट्रिक पूर्ण केली.

विजय हजारे ट्रॉफीत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज

प्रिन्स २०२४-२५ हंगामातील ५० षटकांच्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत दिल्लीसाठी आघाडीचा विकेट घेणारा गोलंदाज देखील होता. २२ च्या सरासरीने त्याने ११ विकेट घेतल्या. IPL 2025 च्या आधीच्या मेगा लिलावात LSG ने त्याला ३० लाखांच्या मूळ किमतीत खरेदी केले.

उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने जानेवारी २०२४ मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये जम्मू आणि काश्मीर विरुद्ध दिल्लीसाठी प्रथम श्रेणी पदार्पण केले आणि तेव्हापासून त्याने २ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. मात्र, दोन रणजी सामन्यांत प्रिन्सला केवळ एकच विकेट घेता आली. त्याने आपल्या कारकिर्दीत ६ लिस्ट ए मॅच आणि ८ टी-२० सामन्यात प्रत्येकी ११ विकेट घेतल्या आहेत.