Who is Shaik Rasheed IPL 2025: चेन्नई सुपर किंग्सने लखनौविरूद्धच्या सामन्यात २० वर्षीय फलंदाज शेख रशीदला पदार्पणाची संधी दिली. संघाचा कर्णधार आणि फलंदाज ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. त्यामुळे संघाला टॉप ऑर्डरमध्ये एका फलंदाजाची गरज भासत होती, तर या सामन्यात डेव्हॉन कॉन्वेला ड्रॉप करत चेन्नईने शेख रशीद याला संधी दिली आणि त्याने आपल्या शास्त्रशुद्ध फटकेबाजीसह सर्वांना भुरळ घातली.
आंध्र प्रदेशच्या २० वर्षीय फलंदाजाने लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध पदार्पण केले. सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने रविचंद्रन अश्विनच्या जागी शेख रशीदचा संघात समावेश केला आहे. शेख रशीद त्याच्या वेगवान फलंदाजीसाठी ओळखला जातो. याशिवाय तो लेग ब्रेक गोलंदाजी देखील करतो.
यश धुलच्या नेतृत्वाखाली इंग्लंडला हरवून १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा रशीद भाग होता. तो टीम इंडियाचा उपकर्णधार होता. त्याने उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत शानदार फलंदाजी केली. याशिवाय, त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार खेळी केल्या.
शेख रशीदला गोलंदाजीची तर संधी मिळाली नाही, पण फलंदाजीत मात्र त्याने शास्त्रशुद्ध फलंदाजीने सर्वांना भुरळ घातली. शेख रशीद सलामीसाठी उतरला होता, त्याने १९ चेंडूत ६ चौकारांसह २७ धावा केल्या. शेख रशीदचे हे ६ चौकार तंत्रशुद्ध फलंदाजीसह पाहायला मिळाले. समालोचकांनीही त्याच्या या फलंदाजीचं कौतुक केलं. तब्बल ३ वर्ष चेन्नईच्या डगआऊटमध्ये पदार्पणाची वाट पाहणाऱ्या शेख रशीदला अखेरीस पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याने आपल्या छोट्या खेळीत छाप पाडली आहे.
कोण आहे शेख रशीद? (Who is Shaik Rasheed?)
२०२२ मध्ये, टीम इंडियाने १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला हरवून पाचव्यांदा विजेतेपद पटकावले. या विश्वचषकात उपकर्णधार शेख रशीदने अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या. उपांत्य फेरीत ३७ धावांत दोन विकेट पडल्यानंतर त्याने ९४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. यानंतर, त्याने अंतिम सामन्यात ५० धावांची लढाऊ खेळी खेळली. शेख रशीद हा मूळचा आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील आहे. त्या स्पर्धेत ५० च्या सरासरीने रशीदने २०१ धावा केल्या.
THE SHOTS OF SHAIK RASHEED ON HIS CSK DEBUT ? pic.twitter.com/OUjoQbdhCq
— Johns. (@CricCrazyJohns) April 14, 2025
२० वर्षीय शेख रशीदने एलिट ग्रुप बी मध्ये आंध्र प्रदेशसाठी २०३ धावांची दमदार खेळी खेळून त्याच्या कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. या खेळीत त्याने ३७८ चेंडूंत २८ चौकार लगावत ही कामगिरी केली होती. शेख रशीदने २०२२ मध्ये आंध्र प्रदेशकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. प्रथम श्रेणी क्रिकेट व्यतिरिक्त, शेख रशीदने लिस्ट ए आणि टी-२० फॉरमॅटमध्ये आपली प्रतिभा दाखवली आहे. लिस्ट ए मध्ये शेख रशीदने ८ सामन्यात ६२ धावा केल्या आहेत. याशिवाय, त्याने टी-२० क्रिकेटमध्ये १० सामन्यांमध्ये २९६ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याचा सर्वोच्च धावसंख्या १०० धावा नाबाद आहे.