IPL 2025 DC vs MI Match Updates in Marathi: दिल्ली कॅपिटल्सचा संघ तुफान फॉर्मात असून मुंबई इंडियन्सविरूद्ध खेळत आहे. मुंबई इंडियन्सचा संघाने नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी उतरला. या सामन्यात रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनने चांगली सुरूवात केली. पण रोहित शर्मा १८ धावा करत पुन्हा फेल ठरला. रोहित शर्माला दिल्लीच्या नव्या गोलंदाजाने बाद केलं, ज्याने विराट कोहलीलाही बाद केलं होतं. पण हा विपराज निगम आहे तरी कोण?

रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांनी मुंबई इंडियन्सला सलामीची जोडी म्हणून चांगली सुरूवात करून दिली. रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांनी ४ षटकांत ४५ धावा केल्या. अक्षरने पाचवे षटक टाकण्यासाठी फिरकीपटू विपराज निगमला पाचारण केलं. विपराजने पाचव्या षटकात २ धावा दिल्या. रोहित शर्मा अखेरच्या चेंडूसाठी स्ट्राईकवर होता. रोहित फटका खेळण्यासाठी चुकला आणि चेंडू जाऊन मांडीवर आदळला.

अक्षर पटेलने लगेच चर्चा करून रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यूमध्ये रोहितची बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नव्हता. त्यामुळे चेंडू बॉल ट्रॅकिंगमध्ये थेट जाऊन विकेटवर आदळलेला दिसला. यासह रोहित शर्मा १२ चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह १८ धावा करत बाद झाला.

चिन्नास्वामी मैदानावर खेळल्या गेलेल्या दिल्लीविरूद्ध आरसीबी सामन्यात विपराज निगमने विराट कोहलीची विकेट घेतली. १४ चेंडूत २२ धावा काढल्यानंतर विराट कोहली विपराज निगमचा बळी ठरला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून विपराज निगमने ४ षटकांत १८ धावा देत २ विकेट्स घेतल्या.

रोहित शर्माला बाद करणारा विपराज निगम आहे तरी कोण?

विपराज निगम हा एक फिरकी-अष्टपैलू खेळाडू आहे. घातक लेग स्पिन गोलंदाजीव्यतिरिक्त, विपराज निगम स्फोटक फलंदाजीतही पारंगत आहे. हा २० वर्षीय अष्टपैलू खेळाडू उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील आहे. विपराज निगम यूपी टी२० लीग दरम्यान प्रसिद्धीच्या झोतात आला, जिथे त्याने २०२४ च्या हंगामातील ११ सामन्यांमध्ये २० विकेट्स घेतल्या.

गेल्या वर्षी, विपराज निगम यूपी टी-२० लीगमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज होता. विपराज निगमने आयपीएल २०२५ मध्ये लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या त्याच्या पदार्पणाच्या आयपीएल सामन्यात त्याच्या स्फोटक फलंदाजीचा ट्रेलरही दाखवला. विपराज निगमने फक्त १५ चेंडूत ३९ धावांची सामना जिंकणारी खेळी खेळली.

आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात विपराज निगमला दिल्ली कॅपिटल्सने फक्त ५० लाख रुपयांना खरेदी केले. विपराज निगम हा उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊजवळील बाराबंकी येथील एका शाळेतील शिक्षकाचा मुलगा आहे. यूपी टी-२० लीगमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे विप्राज निगमला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे.