IPL 2025 DC vs SRH Who is Zeeshan Ansari: दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने वादळी फलंदाजी करणाऱ्या हैदराबादला ७ विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दिल्लीच्या संपूर्ण संघाने सांघिक खेळाच्या जोरावर तिन्ही विभागांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. पण अशातच हैदराबादच्या नव्या गोलंदाजाने पदार्पणातील आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधलं तो म्हणजे झीशान अन्सारी. पण हा नवा फिरकीपटू झीशान अन्सारी कोण आहे, जाणून घेऊया.

झीशान पहिल्यांदाच आयपीएल खेळत असून दिल्लीच्या तीन फलंदाजांना बाद करण्यात तो यशस्वी ठरला. त्याने आयपीएलच्या पदार्पणाच्या सामन्यातच ३ महत्त्वाचे विकेट घेत दिल्लीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. या सामन्यापूर्वी झीशानने वरिष्ठ स्तरावर फक्त एकच टी-२० सामना खेळला होता. हा सामना २०१९ मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये उत्तरप्रदेश विरुद्ध उत्तराखंड होता, ज्यामध्ये त्याला एकही विकेट मिळाली नव्हती.

आठव्या षटकात अन्सारीला गोलंदाजीसाठी चेंडू सोपवला. पहिल्या षटकात त्याने आठ धावा दिल्या आणि नंतर डावाच्या १० व्या षटकात हैदराबादला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला. त्याने दिल्लीचा सलामीवीर फाफ डु प्लेसिसला मिड विकेटला झेलबाद केले. वियान मुल्डरने उत्कृष्ट धावत जाऊन झेल टिपला आणि अन्सारीच्या पदार्पणात त्याला पहिली विकेट मिळवून दिली. या लेग स्पिनरने १० व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बेधडक फलंदाजी करणाऱ्या जेक फ्रेझर-मॅकगर्कला बाद केले. अन्सारीच्या चेंडूवर सलग तीन चौकारांसह दोन चौकार आणि एक षटकार मारणारा फ्रेझर-मॅकगर्क ३८ धावांवर झेलबाद झाला.

अन्सारीने त्यानंतर त्याच्या तिसऱ्या षटकात केएल राहुलची मोठी विकेट घेतली. राहुलने चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न केला, पण तो चेंडू चुकला आणि क्लीन बोल्ड झाला. अन्सारीने ४ षटकांत ४२ धावा देत ३ विकेट घेतले.

कोण आहे झीशान अन्सारी?

झीशान अन्सारी हा मूळचा लखनौचा आहे. अन्सारीने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेश संघासाठी फक्त एकच टी-२० सामना खेळला आहे, ज्यामध्ये पदार्पणात ३२ धावा देऊन तो विकेटविना परतला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणापूर्वी, अन्सारीने २०१६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व केले होते, या स्पर्धेत भारत उपविजेता ठरला होता. या संघात ऋषभ पंत, इशान किशन, सर्फराझ खान हे खेळाडूदेखील होते.

भारताच्या १९ वर्षांखालील विश्वचषक संघातील इतर खेळाडूंप्रमाणे, झीशान १४ किंवा १६ वर्षांखालील संघात त्याच्या राज्याचे प्रतिनिधित्व केले नाही. झीशान जेव्हा वयोगटातील संघांमध्ये स्थान मिळवू शकला नाही, तेव्हा त्याचे बाबा क्रिकेटसाठी प्रयत्न करून थकले होते. झीशानचं कुटुंब हे १९ जणांचं आहे. सातत्याने संघात संधी मिळवण्यापेक्षा त्याने जर वडिलांना आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी मदत केली असती तर त्याचा अधिक फायदा झाला असता. पण प्रयत्नांना यश नक्कीच मिळते म्हणतात तसंच झीशानसह झालं.

यूपी टी२० लीगमध्ये मेरठ मॅव्हेरिक्सचे प्रतिनिधित्व करताना, अन्सारी गेल्या वर्षी स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. झीशानने या स्पर्धेत सर्वाधिक २४ विकेट घेतले होते. नोव्हेंबर २०२४ मध्ये जेद्दाह येथे झालेल्या आयपीएल २०२५ मेगा लिलावात झीशानवर हैदराबादने ४० लाखांची बोली लावत त्याला संघात सामील केले.