Tilak Varma Retired Out LSG vs MI: लखनौ सुपर जायंट्स विरूद्ध सामन्यात मुंबई इंडियन्सचा तारणहार ओळख मिळवलेल्या तिलक वर्माला रिटायर्ड आऊट करण्यात आलं. मुंबई इंडियन्सचा हा निर्णय पाहून संघाचे खेळाडू तसेच सर्वजण चकित झाले. तिलक वर्मा धावा काढण्यासाठी झुंजताना दिसला. त्याचे मोठे फटके लावण्याचे प्रयत्न विफल ठरत होते. परिणामी मुंबईने त्याला रिटायर्ड आऊट केलं आणि सँटनरला मैदानात धाडलं. पण तिलकला रिटायर्ड आऊट करण्याचा निर्णय कोणाचा होता? जाणून घ्या.

तिलक वर्मा २३ चेंडूत २५ धावा करून बाद न होता माघारी परतला. मुंबई इंडियन्सने निर्णय घेत त्याच्या जागी मिचेल सँटनर फलंदाजीला आला, पण त्याचाही काही फायदा झाला नाही. मुंबईला अखेर पराभवाला सामोरे जावे लागले. सामन्यानंतर अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले. तर सामन्यानंतर हार्दिकने संघाला मोठ्या फटक्यांची गरज असल्याने त्याला रिटायर्ड आऊट केल्याचे म्हटले. तर सामन्यानंतर पत्रकार परिषदेत संघाचे कोच महेला जयवर्धने यांनी यावर वक्तव्य केलं.

लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या पराभवानंतर, स्वतः मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकांनी खुलासा केला की, तिलक वर्माला रिटायर्ड आऊट करून परत बोलावण्याचा निर्णय त्यांनी स्वत: घेतला होता. त्यांच्या मते हा रणनीतीचा भाग होती. सामन्याची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी तिलक वर्माला माघारी बोलावले.

कोच महेला जयवर्धने म्हणाले, “संघाने जेव्हा नमन धीरची विकेट गमावली तेव्हा तिलकने चांगली फलंदाजी केली आणि सूर्यकुमारबरोबर भागीदारी रचली. तो मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत होता, पण तो अपयशी ठरत होता. आम्ही शेवटच्या काही षटकांपर्यंत वाट पाहत होतो, अशी आशा होती की त्याने मैदानावर वेळ घालवला आहे, त्यामुळे तो मोठे फटके खेळेल. पण तो संघर्ष करताना दिसत होता आणि त्या क्षणी, संघाला एखाद्या नव्या खेळाडूची आवश्यकता असते. अशा प्रकारे एखाद्याला बाद करणं चांगले नाही, परंतु त्यावेळी रणनितीचा भाग म्हणून तो निर्णय घ्यावा लागला,” जयवर्धने म्हणाला.

जयवर्धने पुढे म्हणाले, “तो एक रणनितीचा भाग म्हणून घेण्यात आलेला निर्णय होता, याबाबत इतर काही विचार करू नका. आम्ही फक्त एका खेळाडूला मैदानाबाहेर बोलावत नव्या खेळाडूला मैदानावर पाठवलं. याचा वेगळा काही अर्थ काढू नका, हा सामन्याची स्थिती पाहता घेतलेला निर्णय होता.”

तिलक वर्माला रिटायर्ड आऊट करण्याचा निर्णय पाहता सूर्यकुमार यादवनेही नाराजी व्यक्त केली. सूर्या तिलकला मैदानाबाहेर येताना पाहून चकित झाला आणि त्याने कोच जयवर्धनेला या निर्णयामागचं कारणही विचारलं. जयवर्धनेने त्याला समजावलं देखी, पण सूर्याच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र बदलले नाहीत.