ज्ञानेश भुरे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १६व्या पर्वाला शुक्रवार, ३१ मार्चपासून सुरुवात होत आहे. गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि माजी विजेत्या चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये सलामीची लढत रंगणार आहे. यंदाच्या पर्वात हे दोन्ही संघ विजेतेपदाच्या शर्यतीत असतील अशी अपेक्षा आहे. संभाव्य विजेत्यांचा विचार करताना चेन्नई आणि गुजरात यांच्या बरोबरीनेच मुंबई इंडियन्स, लखनऊ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स या संघांनाही विसरता येणार नाही.
गुजरात जायंट्सला जेतेपद राखण्याची कितपत संधी?
गेल्या वर्षी ‘आयपीएल’ पदार्पणातच गुजरातचा संघ विजेतेपदापर्यंत मजल मारेल असा अंदाज कोणीही बांधला नव्हता. मात्र, आता नव्या पर्वाला सुरुवात होत असताना संभाव्य विजेत्यांच्या यादीत गुजरातला प्राधान्य मिळत आहे. जुन्याबरोबर काही नवी अस्त्रे (खेळाडू) त्यांच्या संघात दाखल झाली आहेत. हार्दिक पंड्याचे नेतृत्व हे गुजरातच्या यशाचे सर्वांत मोठे कारण. दुखापती आणि स्वच्छंद राहणीमान यामुळे कारकीर्द धोक्यात आलेल्या हार्दिकला गेल्या ‘आयपीएल’ने संजीवनी दिली. खेळाडूच नाही, तर एक अभ्यासू कर्णधार म्हणून तो समोर आला. पंड्याकडे शुभमन गिल, मोहम्मद शमी, रशीद खान, डेव्हिड मिलर असे तगडे खेळाडू आहेत. लॉ़की फर्ग्युसन आता कोलकाता संघात परतल्याने त्याची उणीव गुजरातला भरून काढावी लागेल.
राजस्थान रॉयल्स संघ कशामुळे जेतेपदाच्या शर्यतीत?
पहिल्यावहिल्या ‘आयपीएल’च्या विजेतेपदानंतर राजस्थानचा संघ ‘आयपीएल’मधून हरवल्यासारखा झाला होता. मात्र, गतवर्षी अंतिम फेरीपर्यंत धडक मारून त्यांनी आपले अस्तित्व पुन्हा एकदा दाखवून दिले. अनुभवी आणि उदयोन्मुख खेळाडूंचा चांगला समन्वय या संघात दिसून येतो. कर्णधार म्हणून संजू सॅमसनने गेल्या हंगामात सर्वांनाच प्रभावित केले. परंतु आता कामगिरीत सातत्य टिकवण्याचे त्याच्यापुढे आव्हान असेल. राजस्थानकडे जोस बटलरसारखा तडाखेबंद फलंदाज आहे. सलामीला खेळणारा बटलर कोणत्याही संघाच्या गोलंदाजांवर हल्ला चढवण्यात सक्षम आहे. युवा यशस्वी जैस्वाल आणि रियान पराग चांगल्या लयीत आहेत. देशांतर्गत स्पर्धांत त्यांच्या कामगिरीत सातत्य राहिले आहे. हेच यश ‘आयपीएल’मध्ये रूपांतरित झाल्यास हे दोन्ही युवा खेळाडू राजस्थानच्या भविष्याचा चेहरा बनू शकतात. तसेच या संघात ट्रेंट बोल्ट, जेसन होल्डर आणि ॲडम झॅम्पा असे गुणवान परदेशी खेळाडू आहेत. अनुभवी फिरकीपटूंची जोडी यजुवेंद्र चहल आणि रविचंद्रन अश्विन यांनी अपेक्षित कामगिरी केल्यास राजस्थानचा संघ पुन्हा एकदा चमत्कार दाखवू शकतो.
लखनऊ सुपर जायंट्स आव्हान उभे करणार?
लखनऊचा संघदेखील ‘आयपीएल’ला नवा. गेल्या वर्षीच या संघाने पदार्पण केले. पदार्पणाच्या स्पर्धेत या संघाने चौथ्या क्रमांकापर्यंत मजल मारली. आता या वर्षी हा संघ अधिक सरस कामगिरी करण्याची मानसिकता राखून असेल. दीपक हूडा, कृणाल पंड्या, कृष्णप्पा गौतम, रोमारियो शेपर्ड आणि मार्कस स्टोइनिस असे अष्टपैलू खेळाडू हे या संघाचे वैशिष्ट्य. त्याचबरोबर आक्रमक सुरुवात देऊ शकणारी क्विंटन डीकॉक आणि कर्णधार केएल राहुल ही भरवशाची सलामीची जोडी या संघाची ताकद वाढवते.
मुंबई इंडियन्सला विजेतेपदाची किती संधी?
सर्वाधिक पाच विजेतीपदे मिरवणारा मुंबई इंडियन्स संघ गेल्या हंगामात गुणतालिकेत अखेरच्या स्थानावर राहिला. पहिले सलग आठ सामने ते हरले. आता हे अपयश मागे सारून मुंबईचा संघ पुन्हा आपल्या लौकिकाला साजेशा कामगिरीसाठी सज्ज झाला आहे. त्यांच्याकडे तेवढी क्षमता आहे. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन अशी सर्वोत्तम फलंदाजांची फळी मुंबईकडे आहे. गोलंदाजीत बुमराची उणीव मात्र मुंबईला भरून काढावी लागेल. यासाठी जोफ्रा आर्चर मुंबईचे आशास्थान ठरू शकेल. कॅमेरुन ग्रीन आणि टीम डेव्हिड हे ऑस्ट्रेलियन अष्टपैलू, तसेच युवा फलंदाज तिलक वर्मा कशी कामगिरी करतात हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल.
चेन्नई सुपर किंग्जला पुन्हा सर्वोत्तम कामगिरी सज्ज?
‘आयपीएल’मध्ये वर्चस्व राखल्यानंतर गेल्या काही हंगामात चेन्नई संघ सर्वोत्तम कामगिरीपासून काहीसा दूर राहिला आहे. या वेळी जेव्हा लिलावात त्यांनी बेन स्टोक्सल तब्बल १६.२५ कोटी रुपयांत खरेदी केले, तेव्हाच ‘विजयासाठी काहीपण’ या नीतीची आठवण झाली. याचे कारण म्हणजे, चेन्नईने लिलावात यापूर्वी कधीच कोणत्या खेळाडूवर १० कोटींपेक्षा अधिकची बोली लावली नव्हती. त्यातच संघाचा चेहरा असणाऱ्या कर्णधार महेंद्रसिंह धोनीची ही अखेरची स्पर्धा असू शकेल. तसे असल्यास त्याला विजयी भेट देण्यासाठी संघातील प्रत्येक खेळा़डू सर्वस्व पणाला लावून खेळणार यात शंका नाही. विशेष म्हणजे क्रिकेटच्या या लघुत्तम प्रारूपातही आपल्या गोलंदाजीचे वेगळेपण जपणारे रवींद्र जडेजा, मोईन अली, महीश थीकसना हे दर्जेदार फिरकी गोलंदाज चेन्नईची ताकद वाढवतात. तसेच वेगवान गोलंदाज दीपक चहरचे पुनरागमनही चेन्नईसाठी महत्त्वाचे ठरू शकेल.