IPL 2025 CSK Coach Stephen Fleming on MS Dhoni Batting Order: चेन्नई सुपर किंग्स संघाला राजस्थान रॉयल्सविरूद्ध ६ धावांनी पराभव पत्करावा लागला. गेल्या दोन सामन्यांमध्ये धोनी कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला येणार यावरून जोरदार चर्चा झाली. चेन्नईला गेल्या दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. या दोन्ही सामन्यांमध्ये फलंदाजी क्रमामुळे धोनीवर टीका होत आहे, पण धोनी लवकर फलंदाजीला का उतरत नाही, यावर संघाच्या कोचने मोठं वक्तव्य केलं आहे.
आरसीबीविरूद्ध सामन्यात धोनी ९व्या क्रमांकवर फलंदाजीला उतरला, तोपर्यंत सामना संघाच्या हातून निसटला होता. तर राजस्थानविरूद्ध धोनी लवकर फलंदाजीला उतरला पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नव्हता. धोनी ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला, जिथे त्याने १६ चेंडूत नाबाद ३० धावा केल्या. धोनीने आपल्या झंझावाती खेळीत तीन षटकार आणि दोन चौकार लगावले. मात्र, ९व्या क्रमांकावर फलंदाजी केल्याबद्दल त्याला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले.
CSK च्या कोचचा धोनीबाबत मोठा खुलासा
राजस्थान रॉयल्सविरूद्ध पराभवानंतर बोलताना फ्लेमिंग म्हणाला, “हे सामन्याच्या स्थितीवर अवलंबून आहे. धोनी त्याप्रमाणे ठरवतो. त्याचं शरीर, त्याचे गुडघे आता पूर्वीसारखे नाहीत. तो व्यवस्थित मुव्ह होतो, पण तरीही ते पूर्णपणे ठिक नाहीत. धोनी संपूर्ण १० षटकं मैदानावर फलंदाजी करू शकत नाही. त्यामुळे तो संघासाठी कशी भूमिका बजावणार, हे त्या दिवसासाठी तो ठरवतो.”
पुढे फ्लेमिंग म्हणाला, “जर सामना आजच्या सारखा संतुलित असेल, तर तो थोडा लवकर फलंदाजीला येतो आणि बाकीच्या वेळेस तो इतर खेळाडूंना संधी देतो. तर धोनी या सगळ्या गोष्टी पाहून समतोल साधत आहे.”
चेन्नईचा संघ धोनीला न खेळवण्याचा विचार करत नसल्याचेही फ्लेमिंगने सांगितले. धोनी संघासाठी खूप महत्त्वाचा असल्याचा उल्लेखही केला. तो पुढे म्हणाला, “मी गेल्या वर्षीही म्हटले होते की तो संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याचं नेतृत्व आणि विकेटकीपिंग खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे धोनीला ९-१० षटकं खेळण्यासाठी फलंदाजीसाठी पाठवले जाणार नाही. तो इतक्या उशिरा कधीच फलंदाजीसाठी उतरला नाही. तो १३-१४ षटकांनंतरच फलंदाजीला उतरतो. तो काय स्थिती आहे ते पाहतो.”