इतर सर्व क्रिकेट मालिकांपेक्षा आयपीएलमध्ये जाहिरातींवर सर्वात जास्त आर्थिक उलाढाल होते. आयपीएलच्या सहाव्या पर्वासाठी एकूण शंभर ब्रँड्स जाहिरात करारात समाविष्ट आहेत आणि त्यांना या थेट स्वरुपातील जाहिरातीतून एकूण १५०० कोटी रूपयांची उलाढाल अपेक्षित आहे. अशा प्रकारची प्रसिद्धी इतर कोणत्याही क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतून या ब्रँड्सना मिळत नाही. अगदी आयसीसीच्या चॅम्पियन्स लीग टी-२० पेक्षा कितीतरी पटींनी जास्त परतफेड आयपीएलच्या सामन्यांमधून होणा-या जाहिरातींतून ब्रँड्सना मिळते. याचे कारण म्हणजे, आयपीएलमध्ये खेळाडूंचा रीतसर लिलाव केला जातो त्यामुळे त्यांच्या टी-शर्टवर जाहिराती कितीही असल्या तरी खेळाडूंचा त्याला विरोध नसतो. तसेच चॅम्पियन्स लीगमध्ये आयसीसीच्या नियमावलींप्रमाणे जाहिरातींवर काही बंधने आहेत. तितकी बंधने आयपीएलमध्ये नाहीत.
इतर क्रिकेट मालिकांपेक्षा जाहिरातींवर बंधने कमी असल्यामुळे आयपीएलसाठी जाहिरातदारांची संख्या जास्त असते. त्यामुळे संघमालकांना यावर्षी खेळाडूंच्या किटमधील एकूण दहा जागा जाहिरातदारांना विकता आल्या. यामध्ये टी-शर्टवरील छातीच्या इथला मध्यभाग, उजवा हात, डावा हात, टी-शर्टच्या मागील भाग, कॅप, हेल्मेटच्यासमोरचा आणि मागील भाग. तसेच खेळाडू वापरत असलेली जर्सी पँन्ट यावरही जाहिरातदारांना जाहिरात देण्याची मुभा असते.
आयपीएल क्रिकेट जगतातला एक आर्थिक इव्हेंट म्हणून चर्चिला जातो. त्यामुळे प्रत्येक जाहिरातदार यात सहभागी होऊ इच्छितो. अगदी प्रतिस्पर्धी जाहिरातदारसुद्धा. या सामन्यांच्या प्रक्षेपणाचे अधिकार सोनी नेटवर्ककडे आहेत आणि यावर्षी आयपीएलने सोनी नेटवर्कचा प्रतिस्पर्धी स्टार इंडियाला देखील सामन्यांच्या जाहिरातीत सामिल करून घेतले आहे. यासर्व गोष्टींमुळे  बीसीसीआयला जास्त फायदा होतो आहे