Why Mitchell Marsh is not Playing in LSG vs GT IPL 2025: ऋषभ पंतच्या नेतृत्त्वाखालील लखनौ सुपर जायंट्स संघाचा आयपीएलमधील पाचवा सामना गुजरात टायटन्स संघाविरूद्ध खेळवला जात आहे. या सामन्यात लखनौने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण लखनौ संघाला या सामन्यात मोठा धक्का बसला आहे. संघाचा फॉर्मात असलेला मिचेल मार्श या सामन्यात संघाचा भाग नाहीये.
लखनौ सुपर जायंट्स संघाला आयपीएल २०२५ मध्ये मोठा धक्का बसला आहे. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात संघाला ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शशिवाय खेळावे लागणार आहे. लखनौच्या या निर्णयामुळे सर्वच चकित झाले. पण नाणेफेकीनंतर ऋषभ पंतने यामागचं कारणही सांगितलं आहे.
कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेकीदरम्यान सांगितलं की मिचेल मार्श त्याची मुलगी आजारी असल्याने वैयक्तिक कारणांमुळे या सामन्यात खेळणार नाही. त्याच्या जागी दिल्लीचा फलंदाज हिम्मत सिंगला संघात स्थान देण्यात आले आहे आणि त्याला आज पदार्पणाची संधी मिळाली आहे.
मिचेल मार्शच्या जागी संधी मिळालेला हिम्मत सिंग आहे तरी कोण?
मिचेल मार्श खेळत नसल्याने त्याच्या जागी हिम्मत सिंगला संधी देण्यात आली आहे. कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, हिम्मत सिंग आज मिचेल मार्शच्या जागी संघात खेळेल. हिम्मत सिंग हा दिल्लीचा आहे आणि तो यापूर्वी दिल्ली प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसला होता. या हंगामाच्या मेगा लिलावात त्याला लखनौ संघाने ३० लाख रुपयांच्या मूळ किमतीसह खरेदी केले. हिम्मत सिंगने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीत ५५ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने यामध्ये ५ वेळा अर्धशतकं झळकावली आहेत आणि त्याचा स्ट्राईक रेट १३२.५१ आहे. आतापर्यंत त्याने एकूण ९१७ धावा केल्या आहेत.
LSGचा कर्णधार ऋषभ पंतने सांगितल्याप्रमाणे मिशेल मार्शची मुलगी आजारी असल्याने मार्श गुजरातविरूद्ध सामना खेळताना दिसणार नाही. ऑस्ट्रेलियाला परतला आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु तो सध्या संघाचा भाग नाही.
मिचेल मार्श हा लखनौ संघाकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने डावाची सुरुवात करताना ५ सामन्यांमध्ये ४ अर्धशतकं झळकावली आहेत आणि एकूण २६५ धावा केल्या आहेत. मिचेल मार्श हा अष्टपैलू खेळाडू असला तरी, दुखापतीनंतर तो पुनरागमन करत असल्याने तो सध्या फक्त फलंदाजी करत आहे.