IPL 2024 Points Table: राजस्थान रॉयल्सचा संघ हा आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. याचसोबत यंदाच्या मोसमात १६ गुण मिळवणारा पहिला संघ ठरला आहे. लखनऊविरूद्धच्या सामन्यात दणदणीत विजय मिळवत संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. या हंगामात राजस्थानने ९ पैकी केवळ एकच सामना गमावला आहे. आतापर्यंत इतर कोणताही संघ १० पेक्षा जास्त गुण मिळवू शकलेला नाही, परंतु राजस्थान संघाने तब्बल १६ गुण मिळवले आहेत. मात्र, राजस्थान रॉयल्सला आयपीएल २०२४ प्लेऑफचे तिकीट अद्याप का मिळालेले नाही, हा प्रश्न सर्वांसमोर आहे.
आयपीएलमध्ये प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी सहसा १६ गुणांची आवश्यकता असते, परंतु अधिकृतपणे राजस्थान रॉयल्सला अद्याप क्वालिफाय झाल्याचा (Q) टॅग मिळालेला नाही. १६ गुण म्हणजे आयपीएलच्या हंगामात क्वालिफाय झाल्याचे मानले जाते पण यंदा असं काय घडलं की राजस्थान १६ गुण मिळवूनही क्वालिफाय झालेला नाही.
१६ गुण मिळवूनही राजस्थान रॉयल्स प्लेऑफसाठी का पात्र नाही?
राजस्थान रॉयल्सने १६ गुण मिळवले आहेत. परंतु या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ वगळता इतर सर्व संघांना अजूनही प्रत्येकी १६ गुण गाठण्याची संधी आहे. सर्व संघ अगदी पूर्ण १६-१६ गुण मिळवू शकतील असे नाही, परंतु गणितानुसार हे शक्य आहे. आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत ६ संघांचे जर १६-१६ गुण असतील, तर सहाही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकणार नाहीत, कारण केवळ चार संघांसाठीच प्लेऑफसाठी जागा निश्चित असते. त्यामुळे चांगला नेट रनरेट असलेल्या चार संघांनाच प्लेऑफसाठी पात्र ठरण्याची संधी मिळेल.
कोलकाता नाईट राईडर्सचा नेट रन नेट इतर सर्व संघांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. केकेआरचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर केकेआर असला तरी त्यांचे गुण फक्त १० आहेत. तर राजस्थान रॉयल्सला आता क्वालिफाय होण्यासाठी अजून एक सामना जिंकावा लागणार आहे. उर्वरित 5 सामन्यांमध्ये आणखी एक सामना जिंकल्यास राजस्थान संघाला प्लेऑफचे तिकीट मिळेल.