आयपीएल चाहत्यांसाठी कर्ण शर्मा हे नाव नवीन नाही. कर्ण ज्या संघात असतो तो संघ जेतेपद पटकावतो अशी दंतकथा आहे. तीन आयपीएलविजेत्या संघांचा कर्ण अविभाज्य घटक होता. उत्तम कामगिरीच्या बरोबरीने कर्ण लकी मॅस्कॉट ठरतो अशा चर्चा क्रिकेटवर्तुळात रंगतात. रविवारी कर्णच्या अफलातून स्पेलच्या बळावर मुंबईने दिल्लीवर थरारक विजय मिळवला. ३७वर्षीय कर्णचा यंदाच्या हंगामातला हा पहिलाच सामना होता. यंदा कर्ण मुंबई संघात असल्याने त्यांचं जेतेपदाचं स्वप्न पूर्ण होणार अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत. लिलावात मुंबई इंडियन्स संघाने ५० लाख रुपये खर्चून कर्णला संघात समाविष्ट केलं होतं.
२०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाने जेतेपदावर नाव कोरलं. विजयी हैदराबाद संघाचा कर्ण भाग होता. २०१७ मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला ताफ्यात समाविष्ट केलं. २०१७ मध्ये मुंबई इंडियन्सने जेतेपद पटकावलं. कर्णचं हे दुसरं आयपीएल जेतेपद होतं. अंतिम लढतीत त्याने केलेली टिच्चून गोलंदाजी आजही क्रिकेटरसिकांच्या स्मरणात आहे. पुढच्या वर्षी म्हणजे २०१८ मध्ये चेन्नई सुपर किंग्सने त्याला संघात घेतलं. योगायोग म्हणजे चेन्नईने त्यावर्षी जेतेपदाची कमाई केली. कर्णचं हे तिसरं आयपीएल जेतेपद ठरलं. सलग तीन वर्षी आयपीएल विजेत्या संघाचा भाग असण्याचा दुर्मीळ विक्रम कर्णच्या नावावर आहे.
डोमेस्टिक क्रिकेटमध्ये अनेक वर्ष रेल्वेचं प्रतिनिधित्व केल्यानंतर कर्ण विदर्भ आणि आंध्र प्रदेश संघांकडून खेळला. मूळचा उत्तर प्रदेशातल्या मेरठचा असलेला कर्ण रेल्वेचं प्रमुख अस्त्र होता. डोमेस्टिक क्रिकेटमधल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावरच कर्णने ऑस्ट्रेलियात भारतासाठी कसोटी पदार्पण केलं. दुर्देवाने त्याला पुढे खेळण्याची संधीच मिळाली नाही. याबरोबरीने त्याने २ वनडे आणि एका टी२० सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.
आयपीएल स्पर्धेत कर्णने २००९ मध्ये पदार्पण केलं. हमखास विकेट पटकावणारा लेगस्पिनर ही त्याची ओळख झाली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि आता पुन्हा मुंबई इंडियन्स असा त्याचा प्रवास राहिला आहे. आयपीएल स्पर्धेत ८५ सामन्यात कर्णच्या नावावर ७९ विकेट्स आहेत. भागीदारी तोडण्यात माहीर फिरकीपटू अशी त्याची ओळख आहे. रविवारी झालेल्या लढतीत यंदाच्या हंगामापासून लागू झालेल्या नव्या नियमाचा फायदा उठवत कर्णने अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्ज आणि के.एल.राहुल अशा ३ महत्त्वपूर्ण विकेट्स पटकावल्या. कर्णलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.