पीटीआय, मुंबई : पुढील वर्षीही इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये खेळणार असल्याची स्पष्टोक्ती शुक्रवारी महेंद्रसिंह धोनीने दिली. चेन्नई शहराशी नाते सांगणाऱ्या या संघासाठी जर मी खेळलो नाही, तर ते अयोग्य ठरेल, असे धोनीने यावेळी सांगितले.
४० वर्षीय धोनी शुक्रवारी चेन्नईसाठी अखेरचा क्रिकेट सामना खेळणार या चर्चाना त्याने पूर्णविराम दिला. ‘‘निश्चितपणे, मी पुढील वर्षी खेळणार आहे. चेन्नईला धन्यवाद न करणे आणि चेन्नईमध्ये न खेळणे अनुचित ठरेल. चेन्नईच्या चाहत्यांना मी निराश करणार नाही. परंतु २०२३ हे माझे शेवटचे वर्ष असेल किंवा नाही, हे आम्हाला पाहावे लागेल,’’ असे धोनीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध हंगामातील शेवटच्या सामन्याच्या नाणेफेकीनंतर सांगितले.
तमिळनाडूत धोनीचा मोठा चाहता वर्ग आहे. तमिळनाडूच्या कुडालोर येथील धोनीच्या एका चाहत्याने आपल्या संपूर्ण घराला चेन्नई सुपर किंग्जच्या पिवळय़ा रंगवले आहे आणि भिंतीवर धोनीची प्रतिमासुद्धा रेखाटली आहे. दोन दिवसांपूर्वीच संघाच्या एका निराश चाहत्याच्या पत्रावर धोनीने दिलेल्या उत्तराने अनेकांची मने जिंकली.
‘आयपीएल’ची चार जेतेपद मिळवणारा चेन्नईच्या संघाला या हंगामात बाद फेरीपर्यंत पोहोचता आले नाही. धोनी, अंबाती रायुडू आणि रॉबिन उथप्पा यांना हंगामात फारशी चमक दाखवता आली नाही. दुखापतीमुळे दीपक चहर स्पर्धेबाहेर गेला. तसेच, जोश हेझलवूडलाही फारशी चमक दाखवता आली नाही. दुसरीकडे मुकेश चौधरी आणि महेश थिकसाना यांनी चांगली कामगिरी केली असली तरीही त्यांना म्हणावे तसे योगदान देता आले नाही.