आयपीएलची सलामी दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी अतिशय निराशाजनक झाली. कोलकाता नाइट रायडर्सकडून पहिल्याच लढतीत पराभूत झालेला दिल्लीचा संघ घरच्या मैदानावर शनिवारी राजस्थान रॉयल्सशी झुंजणार आहे. या पाश्र्वभूमीवर आयपीएल गुणतालिकेतील खाते उघडण्यासाठी दिल्लीचा संघ उत्सुक असेल.
केव्हिन पीटरसन आणि जेसी रायडर यांच्यासारख्या फलंदाजांच्या अनुपस्थितीत महेला जयवर्धनेच्या नेतृत्वाखालील दिल्लीच्या मधल्या फळीची चिंता पहिल्याच सामन्यात तीव्रतेने समोर आली. स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग सलामीच्या सामन्यात पाठदुखीमुळे खेळू शकला नव्हता. परंतु तो शनिवारी परतल्यास दिल्लीची फलंदाजी सावरू शकते.
ईडन गार्डन्सच्या धिम्या खेळपट्टीवर कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात जयवर्धने आणि ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर यांनी संघाला धडाकेबाज सुरुवात करून दिली. परंतु त्यानंतर दिल्लीची मधली फळी सपशेल कोसळली. त्यामुळे कोलकात्याने सहा विकेट राखून आरामात विजयी सलामी नोंदवली.
दमदार फलंदाज मनप्रित जुनेजाला संधी देण्याचा दिल्लीचा निर्णय यशस्वी ठरू शकला नाही. मधल्या फळीत दिल्लीला अनुभवी वेणूगोपाल रावची आवश्यकता होती. मागील वर्षी ‘पर्पल कॅप’चा मानकरी झालेल्या मॉर्नी मॉर्केलची अनुपस्थिती दिल्लीला दुसऱ्या सामन्यातसुद्धा तीव्रतेने भासेल. त्यामुळे दिल्लीची मदार वेगवान गोलंदाज इरफान पठाण, आशीष नेहरा आणि उमेश यादव यांच्यासह डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाझ नदीमवर असेल. मॉर्केल सध्या दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक क्रिकेटमध्ये खेळत असून, तो ८ एप्रिलला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यासाठी दिल्लीला उपलब्ध होऊ शकेल.
२००८मध्ये महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने आश्चर्यकारक विजेतेपद पटकावले होते. परंतु त्यानंतर हा संघ गुणतालिकेतील तळाच्या अध्र्या स्थानांवर दिसला. आयपीएलचा सहावा हंगाम भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडसाठी अखेरचा ठरण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज शेन वॉटसनमुळे राजस्थानची आघाडीची फळी मजबूत झाली आहे. वॉटसन पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. याशिवाय नुकतेच कसोटी पदार्पण करणाऱ्या अजिंक्य रहाणेविषयी सर्वानाच उत्सुकता आहे. मागील आयपीएल हंगामात रहाणेने आपल्या लाजवाब फलंदाजीनिशी छाप पाडली होती. त्याने १६ सामन्यांत एक संस्मरणीय शतकासह ५६० धावा केल्या होत्या. वॉटसनच्या अनुपस्थितीत द्रविड रहाणेसोबत सलामीला उतरेल. उभय संघांत आतापर्यंत झालेल्या १० सामन्यांपैकी ६ दिल्लीने तर चार ४ राजस्थानने जिंकले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा