आयपीएलच्या १५ व्या हंगामाचा थरार आजपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी गतविजेता संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ एकमेकांना भिडतील. दरम्यान एकीकडे आयपीएलच्या १५ व्या हंगामाची सगळीकडे चर्चा असताना आता महिला आयपीएल संदर्भात एक मोठी माहिती समोर येतेय. पुढील वर्षी म्हणजेच २०२३ पासून बीसीसीआय महिला आयपीएल सुरु करण्याचा विचार करत आहे. त्या दृष्टीने बीसीसीआयने पाऊले टाकण्यास सुरुवात केली असून शुक्रवारी म्हणजेच २५ मार्च रोजी आोजित करण्यात आलेल्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी गव्हर्निंग काऊन्सिलच्या सदस्यांची तब्बल दोन वर्षानंतर प्रत्यक्षपणे बैठक पार पडली. या बैठकीत महिला आयपीएलवर चर्चा करण्यात आली. तसेच महिला आयपीएलचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न करण्याचा ठरवा या बैठकीत मंजूर करण्यात आला. महिला खेळाडूंच्या सहा संघाचा समावेश असलेली महिला आयपीएल स्पर्धा खेळवण्याची व्यवहार्यता तपासण्याचेही या बैठकीत मान्य करण्यात आले.
महिला आयपीएलसाठी सहा संघाची निर्मिती करुन स्पर्धेचं आयोजन करण्यावर विचार केला जाणार आहे. त्यासाठी सध्या आयपीएलमधील फ्रेंचायझींना महिला संघांची निर्मिती करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर अन्य पर्यायांचा विचार करण्यात येईल. सध्याच्या काही फ्रेंचायझी महिला आयपीएलमध्ये संघ तयार करण्यास उत्सूक आहेत. त्यांच्याशी याविषयी चर्चा केली जाणार आहे.
महिला आयपीएलच्या आयोजनाबद्दल गव्हर्निंग काऊन्सिलच्या एका सदस्याने याबाबत अधिक माहिती दिली आहे. “महिला आयपीएल सध्याच्या आयपीएलसोबत आयोजित करणे तसे शक्य नाही. मात्र आगामी काळात ही स्पर्धा कशी आयोजित केली जाऊ शकते यावर विचार केला जाईल. त्यानंतर आराखडा बनवून एजीएमकडून त्यावर मंजुरी घेतली जाईल,” असे या सदस्याने सांगितले. तसेच यावर्षी महिला आयपीएलचे आयोजन करणे शक्य होणार नसले तरी महिला टी-२० चॅलेन्ज स्पर्धेमध्ये यावेळ तीन संघांमध्ये चार सामने आयपीएलदरम्यान खेळवले जातील, असेदेखील त्यांनी सांगितले.