भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळविणे, हेच आव्हानात्मक असते. कारण या देशात क्रिकेटकरिता भरपूर नैपुण्य आहे. मला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय)भारताकडून खेळायचा प्रस्ताव दिला तर मी निश्चित खेळेन, असे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने सांगितले.
ब्लेड्स ऑफ ग्लोरी संग्रहालयाला गेल आणि श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन यांनी शुक्रवारी भेट दिली. गेलने काही दिवसांपूर्वी पुणे वॉरियर्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात बंगळुरूमध्ये नाबाद १७५ धावा केल्या होत्या. त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीची बॅट त्याने या संग्रहालयाला भेट दिली. तसेच त्याने विश्वचषक स्पर्धेतील आपली जर्सी व आणखी एक बॅटही भेट दिली.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना गेल म्हणाला, ‘‘भारतीय संघात स्थान मिळविणे ही काही सोपी गोष्ट नाही. भारतीय संघाने ट्वेन्टी-२० व एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगज्जेतेपद मिळविले आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटविषयी मला खूप आदर आहे. भारतात क्रिकेट हा अतिशय लोकप्रिय खेळ आहे आणि येथे विपुल प्रमाणात नैपुण्यही उपलब्ध आहे. प्रत्येक स्थानाकरिता येथे झगडावे लागते. मला जर या संघात खेळण्याचा प्रस्ताव आला तो मी आनंदाने स्वीकारेन.’’
ही शैली विकसित करण्यासाठी नवीन मुलांना तू काय सल्ला देशील, असे विचारले असता गेल म्हणाला, ‘‘एखाद्या अव्वल दर्जासारखा समान दर्जाचा खेळाडू होणे शक्य नसते. कारण प्रत्येकाची शैली विभिन्न असते. मात्र अव्वल दर्जाचा आंतरराष्ट्रीय खेळाडू होण्यासाठी चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण घेतले पाहिजे, सरावात एकाग्रता पाहिजे. खेळावर निष्ठा असली व त्यास मेहनत आणि चिकाटीची जोड दिली तर कोणतेही ध्येय साकार होऊ शकेल.’’
पावणेदोनशे धावांबाबत विचारले असता तो म्हणाला, ‘‘त्यादिवशी खेळाच्या सुरुवातीला पाऊस पडला होता. खेळपट्टी चांगली होती आणि किमान १८०-१९० धावांचे ध्येय डोळ्यासमोर ठेवीत आम्ही फलंदाजीस उतरलो होतो. मी माझ्या नैसर्गिक शैलीने खेळलो. मात्र मी नाबाद १७५ धावा करीन असे मला कधी वाटले नव्हते. सुदैवाने आक्रमक खेळाला पोषक गोलंदाजी झाली. गोलंदाजांचे हाल झाले असतील परंतु या खेळीविषयी मला खूप आनंद झाला.’’
‘‘एक वेळ ट्वेन्टी-२०मध्ये दोनशे धावा करणे शक्य आहे. मात्र भारतीय भाषा शिकणे अवघड आहे. आयपीएल स्पर्धेमुळे काही परदेशी खेळाडू भारतीय भाषा बोलू लागले आहेत. मला मात्र भारतीय भाषा शिकणे जरा कठीणच वाटत आहे,’’ असेही गेल म्हणाला. या वेळी संग्रहालयाचे संस्थापक रोहन पाटे हेही उपस्थित होते.
मुरलीची खिलाडूवृत्ती
ब्लेड्स ऑफ ग्लोरी संग्रहालयाला भेट देणे, हे मुथय्या मुरलीधरनच्या नियोजित कार्यक्रमात नव्हते. तो ऐनवेळी गेल याच्याबरोबर येथे आला होता. गेल व्यासपीठावर आले, त्यावेळी मुरली हा तेथेच बाजूला उभा होता. एक दोन पत्रकारांनीच आपल्या खुच्र्या त्याला बसण्यासाठी देऊ केल्या. त्यावेळी आपण आयत्यावेळी आलो आहोत आणि भाषण करणार नसल्याचे सांगून त्याने खिलाडूवृत्ती दाखविली. अखेर गेलच्या हस्ते बॅटीच्या आकाराचा केक कापण्यात आला, त्यावेळी त्याला व्यासपीठावर बसायला खुर्ची देण्यात आली.