आयपीएलनंतर टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC WTC फायनल) खेळायची आहे. भारतीय संघाचा नियमित यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत कार अपघातात जखमी झाल्याने तो संघापासून दूर आहे आणि टीम इंडियाची योजना के.एल. राहुलला येथे यष्टीरक्षक फलंदाज म्हणून आजमावण्याची होती पण आता तो देखील दुखापतीमुळे बाहेर आहे. दरम्यान, भारतीय कसोटी संघाच्या प्लॅनमधून बाहेर पडलेला ऋद्धिमान साहा या भूमिकेसाठी योग्य वाटतो. साहाची किपिंग जबरदस्त आहे, याशिवाय तो आयपीएलमध्येही खूप धावा करत आहे.
रविवारी गुजरातकडून आयपीएलमध्ये खेळणाऱ्या साहाने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध ४३ चेंडूत ८१ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. या खेळीत त्याने १० चौकार आणि ४ षटकारही ठोकले. त्याने शुबमन गिलला (९४*) सोबत घेत सलामीच्या विकेटसाठी १४२ धावा जोडल्या. साहाच्या या फलंदाजीनंतर पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटमध्ये अशी चर्चा सुरू झाली आहे की, टीम इंडिया जेव्हा यष्टीरक्षक फलंदाजाच्या शोधात आहे, तेव्हा साहाची कसोटी संघात निवड का करण्यात येऊ नये.
असा सवाल भारताचा माजी वेगवान गोलंदाज डोडा गणेशनेही आपल्या ट्विटर हँडलवर विचारला आहे. साहाच्या या खेळीनंतर गणेशने ट्विटरवर प्रश्न केला की “साहा डब्ल्यूटीसी फायनलमध्ये असावा का?” यासोबतच त्याने क्रिकेट ट्विटर हा हॅशटॅग वापरला आहे. या सामन्यात साहाने अवघ्या २० चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि आता तो गुजरात टायटन्ससाठी सर्वात वेगवान अर्धशतक करणारा फलंदाज देखील आहे. पण डिसेंबर २०२१ पासून साहा भारतीय कसोटी संघाचा भाग नाही. बीसीसीआयच्या वरिष्ठ संघाच्या निवडकर्त्यांनी भारतीय संघाच्या भविष्याचा विचार करून साहाला त्यांच्या निवड योजनांमधून बाहेर ठेवले होते, परंतु आता टीम इंडियाकडे या स्थानासाठी दुसरा पर्याय नसल्याने निवडकर्त्यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसारखे सामने लक्षात घेता त्याचा विचार करावा लागेल.
भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी काही वर्षांपूर्वी ऋद्धिमान साहाला निवृत्त होण्याचा सल्ला दिला होता. मात्र तोच खेळाडू सध्या आयपीएल गाजवत असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळण्यासाठी संघाचे दार ठोठावत आहे. ऋद्धिमान साहाला भारतीय संघातून वगळल्यानंतर बराच वाद झाला होता. साहाने उघडपणे सांगितले होते की, बीसीसीआयचे तत्कालीन प्रमुख सौरव गांगुली यांनी त्याला संघात ठेवण्याचे आश्वासन दिले होते, मात्र, राहुल द्रविड यांनी वरिष्ठ पत्रकाराशी झालेल्या वादानंतर त्याचे भविष्य ठरवण्यास सांगितले होते. साहा म्हणाला की, “द्रविडने त्याला दक्षिण आफ्रिका मालिकेनंतर निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला होता. राहुल द्रविडनेही आपण तसे बोलल्याचे मान्य केले होते.”