Yashasvi Jaiswal Statement On Vaibhav Suryavanshi: राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२५ स्पर्धेच्या लिलावात हिरा शोधून काढला आहे. २०२५ हंगामासाठी झालेल्या लिलावात राजस्थान रॉयल्सने अंडर १९ चा सामना खेळलेल्या वैभवला संघात घेण्यासाठी १.१ कोटी इतकी किंमत मोजली. आपल्या पहिल्याच सामन्यात फलंदाजी करताना त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला होता. आता कारकिर्दीतील तिसऱ्या सामन्यात त्याने या हंगामातील सर्वात वेगवान शतक झळकावलं आहे.
राजस्थान रॉयल्सला हा सामना जिंकण्यासाठी २१० धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना राजस्थानने १५.५ षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं. वैभवने ३८ चेंडूत १०१ धावांची खेळी केली. तर यशस्वी जैस्वाल ७० धावांवर नाबाद राहिला. या सामन्यानंतर यशस्वी जैस्वालने वैभव सूर्यवंशीचं कौतुक केलं. यासह त्याच्या रणनीतीबाबतही खुलासा केला आहे.
काय म्हणाला यशस्वी जैस्वाल?
सामन्यानंतर बोलताना यशस्वी जैस्वाल म्हणाला, “ अविश्वनीय खेळी.. मी माझ्या कारकिर्दीत आतापर्यंत पाहिलेली ही सर्वोत्तम खेळी आहे. अशीच कामगिरी तो यापुढेही करेल अशी आशा करतो. मी त्याला फक्त पुढे जा असं म्हणत होतो. त्याने अप्रतिम फटके मारले. तो नेट्समध्ये खूप मेहनत घेतो. त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.”
दोघांमध्ये काय संवाद झाला?
तसेच तो पुढे म्हणाला, “ आमच्यात हीच चर्चा सूरू होती की, कोणाला तरी एकाला टिकून खेळावं लागेल आणि सामना शेवटपर्यंत घेऊन जावा लागेल. माझं सौभाग्य आहे, मी शेवटपर्यंत टिकून राहिलो आणि मी पूर्ण जोर लावला. ” या सामन्यात वैभवने विक्रमी खेळी केली. यासह यशस्वी जैस्वालनेही आयपीएल स्पर्धेत २००० धावा पूर्ण केल्या.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, राजस्थान रॉयल्सने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शनने ३९ धावांची खेळी केली. तर शुबमन गिलने ८४ धावा केल्या. शेवटी जोस बटलरने नाबाद ५० धावा करत संघाची धावसंख्या २०९ धावांवर पोहोचवली. राजस्थान रॉयल्सला हा सामना जिंकण्यासाठी २१० धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना वैभवने १०१ तर यशस्वीने ७० धावा करत संघाला ८ गडी राखून विजय मिळवून दिला.