Yashaswi jaiswal Smasehs Six Viral Video : इंडियन प्रीमियर लीग २०२३ चा ३७ वा सामना गुरुवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगला. परंतु, पहिल्या इनिंगमध्ये युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने आक्रमक फलंदाजीचा जलवा दाखवला. त्यानंतर चाहत्यांनाही प्रश्न पडला की हा जैस्वाल आहे की बटलर! जैस्वालने चेन्नईच्या अनुभवी गोलंदाजांचा धुव्वा उडवत २६ चेंडूत वादळी अर्धशतक ठोकलं. जैस्वालने ४२ चेंडूत ८ षटकार आमि ४ चौकारांच्या मदतीनं ७७ धावांची जबरदस्त खेळी साकारली. परंतु, रविंद्र जडेजाने फेकलेल्या सातव्या षटकातील चौथ्या चेंडूवर जैस्वालने ठोकलेल्या षटकाराची क्रीडाविश्वात तुफान चर्चा रंगलीय.
कारण भारतीय खेळाडू अशाप्रकारचा शॉट क्वचितच मारताना दिसतात. ज्यांच्याकडे खूप चांगली टेकनीक आहे, असे युवा फलंदाज अशाप्रकारे चेंडूला सीमारेषापार पोहोचवतात. परंतु, जैस्वालने ज्या आत्मविश्वासाने रिव्हर्स स्वीप लॉफ्टेट शॉट मारला, ते पाहून आख्ख्या स्टेडियममध्ये सर्वांच्याच भुवया उंचावल्या. जैस्वालला हा शॉट शिकवण्यात कोच ज्वाला सिंह यांचा खारीचा वाटा आहे. त्यांनी जैस्वालच्या फलंदाजीबाबत बोलताना म्हटलं, “या शॉटचा सराव करताना मी यशस्वी जैस्वालसोबत खूप वेळ राहिलो आहे. मी सांगितलं होतं की, सुरुवातीच्या षटकांमध्ये असे शॉट मारण्यापासून सावध राहा.
नक्की वाचा – आयपीएलची हवा…पण वनडेत ‘या’ चार दिग्गज फलंदाजांनी आणलं वादळ, ठोकलं सर्वात वेगवान अर्धशतक
इथे पाहा व्हिडीओ
पंरतु, त्याने नेटमध्ये केलेला सराव आणि सराव सामन्यात रिव्हर्स लॉफ्टे शॉट खेळून माझा विश्वास जिंकला. तो आयपीएलमध्ये सहज आणि आत्मविश्वासाने या शॉट खेळेल, याचा मला विश्वास होता. मी त्याला सांगितलं की, पुढील सामन्यांमध्ये आवश्यक असेल तेव्हा आणि संधी मिळाल्यावर हा शॉट खेळत जा.” चाहत्यांनाही जैस्वालच्या फलंदाजीची भुरळ पडली असून षटकाराच्या व्हिडीओवर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. जैस्वालचा हा षटकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.