इंडियन प्रिमिअर लीगच्या १५ व्या हंगामातील १२ वा सामन्यामध्ये मंगळवारी राजस्थान रॉयल्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चार गडी आणि पाच चेंडू राखून जिंकला. या सामन्यामध्ये एकावेळी विजय अवघड वाटत असतानाच संयमाने खेळ केल्याने बंगळुरुने विजय मिळाला. मात्र या सामन्यात सर्वांच्या नजरा टिकून होत्या त्या फिरकीपटू युजवेंद्र चहलवर. मागील पर्वापर्यंत बंगळुरुकडून खेळणारा चहल यंदा त्याच संघाविरोधात मैदानात उतरला. विशेष म्हणजे आपल्या गोलंदाजीसोबतच त्याने विराट कोहलीला धावबाद करण्याचा पराक्रमही केला. एका माजी संघ सहकाऱ्याने विराटला धावबाद केल्याने सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा रंगलीय. विशेष म्हणजे या मजेदार योगायोगावर राजस्थानच्या संघाने अगदी भन्नाट शब्दांमध्ये ट्विट केलंय.

झालं असं की नवव्या षटकातील चौथ्या चेंडूवर विराट कोहलीने एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आपला पहिलाच चेंडू खेळणाऱ्या डेविड वेल्लीने ऑफ साइडचा चेंडू हळूच ढकलला. मात्र आधी धाव घेण्याचा इशारा देऊन नंतर नकार दिल्याने कोहलीचा गोंधळ झाला आणि अर्ध्या क्रीजवरुन त्याला मागे फिरावं लागलं. पण संजू सॅमसनने नॉन स्ट्राइकर्स एण्डला केलेला भन्नाट थ्रो चहलने अचूक टीपला आणि कोहलीला धावबाद केलं. अगदी काही इंचांच्या फरकाने कोहलीची बॅट क्रिजपासून दूर राहिली आणि तो धावबाद झाला. कोहली पाठोपाठ चहलने डेविड वेल्लीलाही बाद केलं.

पण ज्यापद्धतीने चहलने विराटला धावबाद केलं त्यावरुन नेटकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आलं. काहींनी चहलने विराटला बाद करणं म्हणजे जुन्या कंपन्यातील बॉसचा अपमान करण्यासारखं असल्याचं म्हटलं तर काहींनी चहलने त्याला संघात स्थान न दिल्याचा सूड पूर्ण केल्याचं वक्तव्य केलं.

व्यक्तीगत खुन्नस म्हणे…

दगा फटका गेल्याचा फटका…

कट्टपा बाहुबली…

या मजेदार कमेंट्समध्ये राजस्थानच्या संघानेही उडी घेत मोजक्या शब्दात समर्पक ट्विट केलंय. “When your ex comes back to haunt you” म्हणजे जेव्हा तुमची पूर्वीश्रमीची प्रेयसी/ प्रियकर तुमच्या मागे लागतो अशा अर्थाने मिश्कील ट्विट राजस्थानच्या ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलं.

या ट्विटला काही तासांमध्ये जवळजवळ दीड हजार रिट्विट मिळाले होते. तर २२ हजाराहून अधिक जणांनी ते लाईक केलेलं.

Story img Loader