Yuzvendra Chahal and Dhansree romantic video: राजस्थान रॉयल्सने त्यांच्या शेवटच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) ९ विकेट्सने पराभव केला होता. या सामन्यात संघाचा स्टार फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने अप्रतिम गोलंदाजी करताना ४ विकेट्स आपल्या नावावर केल्या. तसेच चहलने या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. दरम्यान या सामन्यानंतर युजवेंद्र चहलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो पत्नी धनश्री वर्मासोबत रोमँटिक अंदाजात दिसत आहे.
राजस्थान रॉयल्सने नुकताच त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये टीमचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहल त्याच्या पत्नीसोबत दिसत आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला चहल आणि धनश्री ‘वो हमदम…’ या बॉलिवूड गाण्यावर रील बनवताना दिसत आहेत. त्याचवेळी संपूर्ण टीम चहलसाठी टाळ्या वाजवताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये चहल नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटी चहल आणि धनश्री एकत्र सायकला चालवताना दिसत आहेत. युजीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे.
युजवेंद्र चहलने ड्वेन ब्राव्होला मागे टाकले –
युजवेंद्र चहलने आयपीएलमध्ये १८३ बळी घेणारा वेस्ट इंडिजचा माजी गोलंदाज ड्वेन ब्राव्होला मागे टाकले. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या सामन्यात चहलने नितीश राणाची विकेट घेताच सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत ब्राव्होला मागे टाकले. चहलने केकेआरविरुद्ध शानदार गोलंदाजी करत चार षटकांच्या स्पेलमध्ये केवळ २५ धावांत चार फलंदाजांची शिकार केली. त्याच्याकडे आता आयपीएलमध्ये १८७ विकेट्स आहेत.
हेही वाचा – Team India: विराट कोहलीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, “कर्णधार म्हणून मी अनेक चुका केल्या, पण …”
राजस्थान रॉयल्सचा हा स्टार गोलंदाज यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. युजवेंद्र चहलने या मोसमात आतापर्यंत एकूण १२ सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये चहलच्या नावावर २१ बळी आहेत. कोलकाताविरुद्धच्या गेल्या सामन्यात चहलने ४ विकेट घेतल्या होत्या. त्याचवेळी चहलला रविवारी त्याचा जुना संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पुढील सामना खेळायचा आहे. चहल या सामन्यातही आपला उत्कृष्ट गोलंदाजीचा फॉर्म कायम ठेवू इच्छितो. चहलने या सामन्यातही चमकदार गोलंदाजी केली आणि झटपट विकेट घेतल्या तर राजस्थानचा विजयाचा मार्ग सुकर होईल.