Yuzvendra Chahal Share Photo With RJ Mahvash: भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. गेल्या महिन्यातच युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला. त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी सर्वांनीच लक्ष वेधलं होतं. यादरम्यान चहलचं नाव आरजे महवश हिच्याबरोबर जोडलं जात आहे. तर आता चहलने आरजे महवशबरोबरचा सेल्फी त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
युझवेंद्र चहल आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्स संघाकडून खेळत आहे. आयपीएल लिलावात चहलला पंजाबने १८ कोटींना संघात सामील केले होते. आयपीएलमध्ये ८ एप्रिल म्हणजे काल झालेल्या सीएसके वि. पंजाब किंग्स सामन्यात आरजे महवश संघाला व चहलला चिअर करताना दिसली होती. या सामन्यात चहलला एकच षटक टाकण्याची संधी मिळाली, तर त्याने यश ठाकूरच्या गोलंदाजीवर धोनीला झेलबाद केलं.
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट होण्यापूर्वीच, भारतीय गोलंदाज आरजे महवशबरोबरद दिसला होता. चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान दोघेही स्टँडमध्ये एकत्र सामना पाहताना दिसले होते. आता आयपीएलमध्येही ती चहल आणि त्याची आयपीएल टीम पंजाब किंग्जला पाठिंबा देण्यासाठी मैदानात दिसली.
सामन्यानंतर, आरजे महवशने चहलसाठी एक खास पोस्ट देखील शेअर केली. चहल सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. त्यानेही इन्स्टाग्रामवर महवाशबरोबरचा फोटो शेअर केला. आता दोघांमधील नात्याबद्दल अधिकाधिक चर्चा होत आहे. चाहत्यांनी या दोघांचं ठरलंय का असे प्रश्न विचारण्यास सुरूवात केली आहे.
महवशने तिच्या इन्स्टाग्रामवर पंजाब किंग्स वि. चेन्नई सुपर किंग्स सामन्यातील काही फोटो शेअर केले, ज्यामध्ये तिने चहलबरोबरचा एक सेल्फी देखील पोस्ट केला. पोस्ट करताना, महवशने कॅप्शनमध्ये लिहिले की, आपल्या माणसांच्या प्रत्येक कठीण काळात मी त्यांच्यामागे ठाम उभी राहते. चहलला टॅग करत त्याने लिहिले की, आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत. तर चहलनेही या फोटोवर कमेंट केली आहे आणि म्हटलं की ‘तुम्ही सर्व माझी सर्वात मोठी ताकद आहात.’

सीएसकेविरूद्ध सामन्यात रचिन रवींद्र बाद झाल्यावर महवशला खूप आनंद झाला. पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने रचिन रवींद्रला बाद केले तेव्हा आरजे महवशची प्रतिक्रिया व्हायरल झाली होती.