Ziva’s cheering for Dhoni’s six, Ziva’s cheering video viral: आयपीएल २०२३ चा ५५ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात चेन्नईने दिल्लीचा २७ धावांनी पराभव केला. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीचा फिनिशिंग टच पुन्हा एकदा सीएसकेच्या इनिंगमध्ये पाहायला मिळाला. धोनीने फक्त ९ चेंडूत २ षटकार आणि १ चौकार मारत २० धावांची छोटी पण वेगवान खेळी खेळली. धोनीने सामन्यात षटकार मारला, तेव्हा स्टँडवर उपस्थित असलेली त्याची मुलगी झिवा आणि पत्नी साक्षी यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या सामन्यात महेंद्रसिंग धोनी फलंदाजीसाठी आला, तेव्हा चेन्नई सुपर किंग्जने १२६ धावांवर ६ विकेट गमावल्या होत्या. धोनीने खलील अहमदविरुद्ध चेन्नईच्या डावातील १९व्या षटकात २ षटकार आणि १ चौकार मारून एकूण २१ धावा केल्या. धोनीच्या षटकाराने संपूर्ण चेपॉक स्टेडियमने जल्लोष केला. यावेळी धोनीचे कुटुंबही सेलिब्रेशन करताना दिसले. मुलगी झिवाने शिट्टी वाजवली आणि पत्नी साक्षीने टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.
धोनीच्या २० धावांच्या खेळीमुळे चेन्नई सुपर किंग्जला या सामन्यात २० षटकांत ८ विकेट्स गमावून १६७ धावांपर्यंत मजल मारता आली. धोनीशिवाय शिवम दुबेने २५, गायकवाडने २४ आणि रायडूने २३ धावा केल्या.
धोनीने या मोसमात आतापर्यंत २०४ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या –
आयपीएलच्या या मोसमात महेंद्रसिंग धोनीचा तोच जुना जबरदस्त फॉर्म आत्तापर्यंत पाहायला मिळत आहे. धोनीने आतापर्यंत ८ डावात ९६ धावा केल्या असून यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट २०४.३६ आहे. यामध्ये धोनी ६ वेळा नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.
हेही वाचा – CSK vs DC: “चाहते मी बाद होण्याची वाट पाहतात”; सीएसकेच्या फॅनबद्दल रवींद्र जडेजाचे वक्तव्य
सामन्याबद्दल बोलायचे, तर १६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीला आठ विकेट्सवर केवळ १४० धावा करता आल्या आणि सामना गमावला. जडेजानेही १९ धावांत एक विकेट घेतली. दिल्लीचा हा सातवा पराभव आहे. त्यांचे तीन सामने बाकी आहेत आणि ते जास्तीत जास्त १४ गुणांपर्यंत पोहोचू शकता. अशा स्थितीत त्याला प्लेऑफमध्ये पोहोचणे शक्य नाही.