IPL Auction 2024 : यंदाचा आयपीएल लिलाव हा अनेक कारणांसाठी चर्चेत आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू मिचेल स्टार्क याला २४.७५ कोटींमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने खरेदी केले. तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला सनरायजर्स हैदराबादने २०.५० कोटींना खरेदी केले. इतर अनेक खेळांडूवर विक्रमी बोली लागत असताना काही भारतीय अनकॅप्ड खेळाडूंवर कोट्यवधीची उधळण झाली. हे अनकॅप्ड खेळाडू आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल अनेकांना उत्सुकता लागली आहे. अशांपैकीच एक आहे, झारखंडमधील रांचीचा ख्रिस गेल रॉबिन मिंझ. गुजरात टायटन्स संघाने ३ कोटी ६० लाख रुपये खर्च करून रॉबिनला त्यांच्या संघात घेतले. यानंतर भावूक झालेल्या रॉबिनच्या वडिलांनी दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. रॉबिनचे वडील भारतीय लष्करातून निवृत्त झालेले असून रांची विमानतळावर सुरक्षा रक्षक म्हणून एका खासगी कंपनीत काम करतात.
४८ वर्षीय फ्रान्सिस झेव्हियर मिंझ यांनी द इंडियन एक्सप्रेसला प्रतिक्रिया देताना सांगितले की, मी नेहमीप्रमाणे विमानतळावर काम करत होतो. तेव्हा एका जवानाने येऊन मला मिठी मारली आणि म्हणाला की, तुम्ही कोट्यधीश झाला आहात. तेव्हा मला कळलं की, माझ्या मुलाला गुजरात टायटन्स संघाने मोठी बोली लावून संघात सामील करून घेतले आहे. मिंझ कुटुंबिय झारखंडमधील गुमला या आदिवासी पट्ट्यात राहतात. याठिकाणी क्रिकेटऐवजी हॉकी हा खेळ अधिक लोकप्रिय आहे. जागतिक दर्जाचे हॉकीपटू या जिल्ह्याने दिले आहेत. रॉबिनचे वडील फ्रान्सिस हेदेखील खेळाडू असून त्याजोरावरच त्यांना लष्कारत काम करण्याची संधी मिळाली. लष्करात नोकरी लागल्यानंतर मिंझ कुटुंबिय रांचीमध्ये आले. रांचीत आल्यानंतर इतरांप्रमाणेच धोनीला आदर्श मानून रॉबिनने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली.
कुणी नाही घेतले, तर मी घेईल; धोनीचा शब्द
फ्रान्सिस मिंझ यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वीच धोनीची आणि माझी रांची विमानतळावर भेट झाली होती. त्यावेळी धोनी म्हणाला की, फ्रान्सिसजी रॉबिनला कुणी नाही घेतले तर आम्ही आमच्या संघात त्याला स्थान देऊ. महेंद्रसिंह धोनीचे लहानपणी प्रशिक्षक असलेल्या चंचल भट्टाचार्य यांनी रॉबिनला स्वतःच्या पंखाखाली घेतले. धोनीप्रमाणेच रॉबिनही यष्टीरक्षक असून फलंदाजी करताना चेंडू मैदानाबाहेर टोलविण्याची त्याच्याकडे अद्भूत अशी क्षमता आहे, असे चंचल यांनी सांगितले.
हेही वाचा – IPL Auction 2024 : पान टपरी चालविणाऱ्याचा मुलगा ठरला कोट्यधीश; जाणून घ्या कोण आहे शुभम दुबे?
ख्रिस गेलसारखे षटकार, २०० चा स्ट्राईक रेट
रॉबिन सध्या रांचीच्या सोनेट क्रिकेट क्लबमध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षक आसिफ हक यांनी सांगितले की, विंडिजच्या ख्रिस गेलप्रमाणेच तुफान फटकेबाजी करण्याची क्षमता रॉबिनमध्ये आहे. हक म्हणाले, “आम्ही त्याला रांचीचा ख्रिस गेल म्हणतो. तो डावखुरा फलंदाज असून त्याची फटकेबाजीची शैली जबरदस्त आहे. गेलप्रमाणेच तो उंच षटकार लगावतो. हा नव्या दमाचा क्रिकेटपटू असून गोलंदाजावर पहिल्या चेंडूपासूनच प्रहार करण्याची त्याची शैली आहे. फलंदाजी करताना तो २०० च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करण्यात पटाईत आहे.”
धोनीनंतर रांचीचे दोन यष्टीरक्षक चर्चेत
रॉबिन प्रमाणेच झारखंडमधील बोकराव येथील कुमार कुशाग्रा या १९ वर्षीय क्रिकेटपटूला दिल्ली कॅपिटल्सने ७.२० कोटी खर्च करून संघात घेतले आहे. कुमार उजव्या हाताचा फलंदाज असून रॉबिनसारखाच तो यष्टीरक्षक आहे. प्रशिक्षक चंचल म्हणाले की, धोनीनंतर झारखंडच्या इशान किशनला भारतासाठी खेळताना आम्ही पाहिले. यंदाच्या लिलावातून कुशाग्रा आणि रॉबिनलाही मोठी संधी मिळाली आहे. हे सर्व खेळाडू यष्टीरक्षक असून गोलंदाजावर तुटून पडणारे आहेत.
एकाच षटकात सहा षटकार मारायला जाऊ नको
चंचल आणि आसिफ या दोन्ही प्रक्षिशकांनी रॉबिनला धोनीचा कानमंत्र लक्षात ठेवण्याची सूचना दिली. रांचीच्या जेएससीए स्टेडियममध्ये एकदा धोनीने रॉबिनला खेळताना पाहिले होते. तेव्हा धोनीने सांगितले, “तू चांगला खेळतोस. खेळपट्टीवर टिकून राहण्याचा प्रयत्न कर. स्वस्तात विकेट देऊ नकोस. षटकार ठोकल्यानंतर एक धाव काढ आणि समोरच्या फलंदाजाला स्ट्राईक दे. प्रत्येकवेळी एकाच षटकात सहा षटकार मारण्याचा प्रयत्न करू नकोस.” आसिफ यांनी हा संवाद पुन्हा एकदा द इंडियन एक्सप्रेसला सांगितला.