भारताचा लोकप्रिय क्रिकेटपटू आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने मद्रास उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अवमान याचिकेनंतर आयपीएस अधिकारी संपत कुमार यांना १५ दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मद्रास उच्च न्यायालायने हा खळबळजनक निकाल दिला आहे. बार अँड बेंच संकेतस्थळाच्या माहितीनुसार, न्यायमूर्ती एसएस सुंदर आणि न्या. सुंदर मोहन यांच्या खंडपीठाने ही शिक्षा सुनावत असताना संपत कुमार यांना शिक्षेविरोधात अपील करण्याची परवानगी दिली असून त्यासाठी ३० दिवसांची मूदत देऊ केली आहे. आयपीएलमधील सट्टेबाजारावर टिप्पणी करत असताना संपत कुमार यांनी धोनीच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यावरून धोनीने मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
प्रकरण काय?
सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्याविरोधात अवमानास्पद भाष्य केल्यामुळे महेंद्र सिंह धोनीने आयपीएस अधिकारी संपत कुमार यांच्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. आयपीएलमधील फिक्सिंग प्रकरणात एमएस धोनीचे नाव घेतल्यामुळे २०१४ साली धोनीने अवमान याचिका दाखल करून १०० कोटींची नुकसान भरपाई मागितली होती. तसेच संपत कुमार यांनी माननीय न्यायालयाच्या विरोधात केलेल्या अवमानकारक वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करावी, अशीही मागणी धोनीने याचिकेच्या माध्यमातून केली होती.
मद्रास उच्च न्यायालयाने संपत कुमार यांना शिक्षा सुनावली असली तरी ३० दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीत ते शिक्षेच्या विरोधात अपील करू शकतात. धोनीने आपल्या याचिकेत म्हटले की, संपत कुमार यांनी आपल्या शपथपत्रात देशाच्या सर्वोच्च न्यायालयासाठी ज्या शब्दांचा वापर केला, ते न्यायालयाचा अवमान करणारे होते. त्यामुळे सामान्य माणसांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडू शकतो.
लाईव्ह लॉ या संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार, संपत कुमार यांनी न्यायमूर्ती मुद्गल समितीच्या (आयपीएल २०१३ मध्ये झालेल्या फिक्सिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्थापन केलेली समिती) अहवालातील काही भाग सर्वोच्च न्यायालयाने सील बंद पाकिटात ठेवला आणि त्या मजकूराला एसआयटीच्या हाती दिले नाही, असा आरोप केला होता. याच विधानावर धोनीने आक्षेप घेतला होता. संपत कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला असल्याचे धोनीने याचिकेत म्हटले.