राजधानी दिल्ली म्हणजे राजकारण, खलबते, धोरणे, बुद्धिजीवी चर्चा हे समीकरण.. मात्र विमानतळापासून मेट्रो स्टेशन आणि बसथांब्यांपासून प्रमुख चौकांमध्ये अशा विभिन्न स्तरांवर टेनिसने गारुड घातल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते आहे.. निमित्त आहे इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीग (आयपीटीएल) या टेनिसविश्वातल्या व्यावसायिक प्रयोगाचे.. मनिला आणि सिंगापूर टप्प्यानंतर जगभरातल्या दिग्गज खेळाडूंचा ताफा दिल्लीत डेरेदाखल झाला आहे.. आल्हाददायक थंडीत इंदिरा गांधी राष्ट्रीय स्टेडिमयवर पुढचे तीन दिवस ही टेनिसमैफल रंगणार आहे.
रॉजर फेडरर, पीट सॅम्प्रस, नोव्हाक जोकोव्हिच या दिग्गजांना दूरचित्रवाणीच्या माध्यमातून अनुभवणे एवढेच भारतीय चाहत्यांच्या हातात होते. मात्र भारताचा दुहेरीतील अव्वल खेळाडू महेश भूपतीनिर्मित इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीगच्या निमित्ताने या सगळ्या दिग्गजांना प्रत्यक्ष खेळताना पाहण्याची संधी भारतीय क्रीडारसिकांना मिळणार आहे. त्यामुळे या स्पध्रेची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
या लीगच्या निमित्ताने आतापर्यंत वैयक्तिक स्वरूपाच्या टेनिसला सांघिक आकार देण्यात आला आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या घवघशीत यशातून बाकी खेळांनी प्रेरणा घेत लीग स्वरुपाच्या स्पर्धा आयोजित करणे मनावर घेतले आहे. मात्र आर्थिक स्थैर्यासह अस्तित्व टिकवणे बहुतांशी लीगसाठी कठीण ठरले आहे. भूपतीची ही ऑफकोर्ट सव्र्हिस अचूक ठरल्यास साचेबद्ध टेनिसमध्येही बदलाचे पर्व येण्याची शक्यता आहे.
ग्रँडस्लॅम आणि पारंपारिक टेनिसची नियमावली आणि शिष्टाचाराचे कोंदण बाजूला सारत वेगवान, आकर्षक आणि चटपटीत टेनिस या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. एक दशलक्ष डॉलर्स एवढय़ा प्रचंड बक्षीस रकमेसह अवतरलेल्या या लीगमध्ये सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा हे भारताचे दोन शिलेदार आहेत.
राजधानीत टेनिसमैफल!
राजधानी दिल्ली म्हणजे राजकारण, खलबते, धोरणे, बुद्धिजीवी चर्चा हे समीकरण.. मात्र विमानतळापासून मेट्रो स्टेशन...
First published on: 06-12-2014 at 06:43 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iptl roger federer novak djokovic pete sampras to light up indian tennis courts