Ajinkya Rahane lead Ranji Champion Mumbai Team in Irani Cup 2024 : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार राहिलेला अजिंक्य रहाणे इंग्लंडमधून काऊंटी क्रिकेट खेळून मायदेशी परतला आहे. तो लखनौ येथे रेस्ट ऑफ इंडिया विरुद्धच्या आगामी इराणी चषक सामन्यात रणजी चॅम्पियन मुंबईचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर अष्टपैलू शार्दुल ठाकूर शस्त्रक्रियेतून बरा झाल्यानंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. या सामन्यासाठी मुंबई संघात श्रेयस अय्यर, मुशीर खान, शम्स मुलानी आणि तनुष कोटियन हे खेळाडू देखील सहभागी होऊ शकतात.
अजिंक्य रहाणे रणजी चॅम्पियन मुंबई संघाचे नेतृत्त्व करणार –
इराणी चषक १ ऑक्टोबरपासून खेळवला जाणार असून या सामन्यात भारतीय संघात समाविष्ट असलेला सर्फराझ खानच्या सहभागाबाबत अद्याप काही गोष्टी स्पष्ट झालेल्या नाहीत. भारतीय संघ २७ सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळणार आहे. उद्या मुंबईचा संघ जाहीर होणार आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, पहा, सर्फराझ हा संघातील एकमेव स्पेशलिस्ट मधल्या फळीतील फलंदाज आहे. ध्रुव जुरेल हा कीपर-फलंदाज आहे आणि अक्षर पटेल हा अष्टपैलू खेळाडू आहे.
सूत्राने पुढे सागितले की, जर फलंदाज जखमी झाला तर काय होईल? इराणी चषक १ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून भारतीय संघाचा सामना लवकरच संपला तर सर्फराझला कानपूरहून लखनौला यायला फारसा वेळ लागणार नाही. उल्लेखनीय म्हणजे अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. रहाणेने शेवटची कसोटी जुलै २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळली होती. तेव्हापासून तो टीम इंडियाच्या बाहेर आहे, तर शार्दुल दुखापत झाली होती.
हेही वाचा – विराट कोहलीचे ‘ड्रॉईंग’ लहान मुलांपेक्षा वाईट आहे का? मांजराचा ‘स्केच’ काढतानाचा VIDEO व्हायरल
इराणी चषक काय आहे आणि कोणत्या संघांमध्ये खेळला जातो?
इराणी कप हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयद्वारे आयोजित वार्षिक प्रथम श्रेणी क्रिकेट सामना आहे. हा प्रत्येक हंगामात गत रणजी चषक विजेते आणि इतर राज्य संघातील खेळाडूंनी बनलेला संघ यांच्यात खेळला जातो. इराणी चषकाचा विजेता एका सामन्याने निश्चित केला जातो.