कर्नाटकचा कर्णधार विनय कुमारने घरच्या मैदानावर खेळताना सहा बळी घेत इराणी चषक क्रिकेट स्पर्धेत शेष भारताचा डाव झटपट गुंडाळण्यात निर्णायक भूमिका बजावली. कर्नाटकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि विनयला साथ देणाऱ्या सर्वच गोलंदाजांनी शेष भारताचा डाव २०१ धावांत गुंडाळत हा निर्णय सार्थ ठरवला.
विनय कुमारने पहिल्याच चेंडूवर जीवनज्योत सिंगला पायचीत केले. युवा बाबा अपराजितही २ धावा करून विनयच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. रणजी हंगामात महाराष्ट्रासाठी खोऱ्याने धावा काढणारा केदार जाधवलाही विनयने पायचीत केले. यानंतर गौतम गंभीर आणि दिनेश कार्तिक जोडीने चौथ्या विकेटसाठी ४२ धावा जोडत डाव सावरला. स्टुअर्ट बिन्नीने गंभीरला बाद करत ही जोडी फोडली. पंजाबचा मनदीप सिंग ५ धावा करून तंबूत परतला. कार्तिकने अमित मिश्राच्या साथीने सहाव्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. मिश्राने ७ चौकार आणि एका षटकारासह ४७ धावांची खेळी केली.
हरभजन-कार्तिक जोडीने सातव्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली. हरभजनने २५ धावा केल्या. हरभजन बाद झाल्यानंतर शेष भारताच्या डावाची घसरण झाली. दिनेश कार्तिकने १४ चौकारांसह ९१ धावांची खेळी साकारली. कर्नाटकतर्फे विनय कुमारने ४७ धावांत ६ बळी घेतले. स्टुअर्ट बिन्नीने ३ बळी घेत त्याला चांगली साथ दिली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना कर्नाटकने पहिल्या दिवसअखेर १ बाद ३५ अशी मजल मारली. रॉबिन उथप्पा भोपळाही फोडू शकला नाही. लोकेश राहुल २८, तर गणेश सतीश ७ धावांवर खेळत आहेत. कर्नाटकचा संघ अजूनही १६६ धावांनी पिछाडीवर आहे.