वडील शेतकरी.. परिस्थिती तशी बेताचीच.. वास्तव्य पालघर.. नेमबाजीसारख्या खेळासाठी हे अनुकूल वातावरण नक्कीच नाही; पण कैकसुरू इराणी याला अपवाद ठरला. पुण्याजवळच्या बालेवाडी संकुलात झालेल्या राज्य नेमबाजी स्पर्धेत इराणीने सहा सुवर्णपदकांसह ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ किताबावर नाव कोरले.
लक्ष्यभेदाच्या या अवघड प्रवासाची कहाणी उलगडताना कैकसुरू म्हणाला, ‘‘वडिलांच्या प्रेरणेमुळेच मी नेमबाजीकडे वळलो. २००१मध्ये मी बीएस्सी आयटी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. अभ्यास आणि नेमबाजीची योग्य सांगड घालताना दमछाक होत होती. पालघरमध्ये सुसज्ज नेमबाजी केंद्र नसल्याने वडिलांनी घराच्या परिसरातच तात्पुरती नेमबाजीची सोय केली. इथूनच माझ्या नेमबाजीचा प्रवास सुरू झाला. नेमबाजीसाठी लागणारी उपकरणे आणि साधनसामुग्री माझ्याकडे नव्हती. अनेकांच्या सहकार्याने या गोष्टी मिळाल्या आणि नेमबाजीला मूर्त स्वरूप आले. शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाची सोय नसताना वडीलच मार्गदर्शन करायचे. वडिलांनी दिलेले शिस्तीचे संस्कार आणि सरावात सातत्य यामुळे अनेक स्पर्धा गाजवल्या. जिल्हा, राज्य स्पर्धामध्ये सहभागी व्हायचो, प्रत्येक वेळी यश मिळायचे नाही पण यातूनच नेमबाजीचे बारकावे शिकलो. महाराष्ट्र रायफल असोसिएशनने दिलेला मदतीचा हात अतिशय महत्त्वाचा ठरला.’’
‘‘नेमबाजीची कारकीर्द बहरत असतानाच डी. वाय. पाटील विद्यापीठात फिजिओथेरपीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्याने मला नेमबाजीसाठी वेळ देता येईना. मात्र तीन वर्षांच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर मी नेमबाजीवर लक्ष केंद्रित केले. पालघरमध्ये जागेची उपलब्धता झाल्यास नेमबाजी केंद्र उभारण्याची आपली इच्छा आहे,’’ असे कैकसुरूने सांगितले. १० मीटर एअर पिस्तूल आणि ५० मीटर थ्री पोझिशन प्रकारातून सहभागी होणारा कैकसुरू सध्या वरळीच्या नेमबाजी केंद्रात सराव करतो