सलग दुसऱ्यांदा रणजी करंडकाचं विजेतेपद मिळवणाऱ्या विदर्भाला यंदाच्या हंगामात इराणी करंडक जिंकण्याची मोठी संधी मिळालेली आहे. शेष भारताचा पहिला डाव 330 धावांवर बाद केल्यानंतर प्रत्युत्तरादाखल विदर्भाने 425 धावांपर्यंत मजल मारली आहे. पहिल्या डावात विदर्भाकडे 95 धावांची आघाडी जमा झालेली असून या सामन्याचे दोन दिवस अजुन बाकी आहेत. विदर्भाकडून अक्षय कर्णेवारने शतक तर संजय रामास्वामी आणि अक्षय वाडकरने अर्धशतकी खेळी केली.
तिसऱ्या दिवसाच्या खेळात कर्णेवार आणि वाडकर जोडीने विदर्भाच्या डावाला आकार दिला. दोन्ही फलंदाजांनी शेष भारताच्या गोलंदाजांचा समाचार घेत विदर्भाला आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या दिवशी कृष्णप्पा गौथम दुखापतीमुळे मैदानावर येऊ शकला नाही, ज्याचा पुरेपूर फायदा विदर्भाच्या फलंदाजांनी उचलला. कर्णेवारने 102 धावांची शतकी खेळी केली. त्याला वाडकरने 73 धावा करत चांगली साथ दिली. विदर्भाच्या अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी शेष भारताला चांगलंच झुंजवलं. अखेर अंकित राजपूतने यश ठाकूरला बाद करत विदर्भाचा डाव संपवला.
शेष भारताच्या गोलंदाजांना तिसऱ्या दिवशी प्रचंड मेहनत घ्यावी लागली. फिरकीपटू राहुल चहरने 40 षटकं फेकत 4 बळी घेतले. त्याला कृष्णप्पा गौथम, धर्मेंद्रसिंह जाडेजा आणि अंकित राजपूतने प्रत्येकी 2 बळी घेत चांगली साथ दिली. त्यामुळे विदर्भाने पहिल्या डावात घेतलेली आघाडी पाठीमागे टाकून शेष भारताचा संघ सामन्यात पुनरागमन करतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.